सांगलीत दुचाकी चोरीचे सत्र पुन्हा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:33+5:302021-08-20T04:30:33+5:30
सांगली : शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. आठवडाभरात सावंत प्लॉट, बायपास रोड आणि ...

सांगलीत दुचाकी चोरीचे सत्र पुन्हा सुरु
सांगली : शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. आठवडाभरात सावंत प्लॉट, बायपास रोड आणि अभयनगर परिसरातून दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर पोलिसात याविषयी फिर्यादी दाखल आहेत.
पिटर शेख मरी (रा. समतानगर, मिरज) यांनी विश्रामबाग पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सावंत प्लॉट परिसरात लावलेली १० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लॉक तोडून लंपास केली. शनिवार, दि. १४ रोजी दिवसभरात हा प्रकार घडला.
किसन विलास आंबी (रा. सांगलीवाडी) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सांगली - इस्लामपूर मार्गावरील एका हॉटेलसमोरुन त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. सोमवार, दि. १६ रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
महिबूब इम्तियाज शेख (रा. अभयनगर, समाधान कॉलनी, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी घरासमोर लावलेली १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. बुधवार, दि. ११ रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
शहरातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर लावलेल्या दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला आहे.