सांगली --सलगरे, उमदीत बुरशीनाशकावर बंदी
By Admin | Updated: August 27, 2014 23:18 IST2014-08-27T23:00:46+5:302014-08-27T23:18:10+5:30
कृषी विभागाची कारवाई : १ कोटी ६0 लाख रुपयांची औषधे जप्त

सांगली --सलगरे, उमदीत बुरशीनाशकावर बंदी
सांगली : सलगरे (ता. मिरज) येथील धानेश्वरी आणि उमदी (ता. जत) येथील गणपती कृषी सेवा केंद्रामध्ये विनापरवाना ‘बीएएसएफ इंडिया’ या कंपनीच्या एक कोटी ६० लाख किमतीच्या ‘झाम्प्रो’ बुरशीनाशकाच्या पाच हजार २८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली आहे. तेथील सर्व बुरशीनाशकांवर विक्री बंदचे आदेश दिले आहेत.
बीएएसएफ इंडिया या कंपनीने तासगाव येथे विनापरवाना बुरशीनाशक उत्पादन केले होते. त्याच्या विक्रीसाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून परवाना घेणे आवश्यक होते; परंतु याकडे त्यांनी दुर्लक्ष करून उत्पादनाची बाजारात विक्री सुरू केली होती. हे बुरशीनाशक द्राक्षबागेवरील दावण्या रोगासाठी वापरले जात होते. या बेकायदेशीर उत्पादनाविषयी शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर जिल्हा गुणनियंत्रकांनी कंपनीचे उत्पादन बंद केले होते. तरीही कृषी केंद्रातून या बुरशीनाशकाची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार जत पंचायत समितीमधील कृषी अधिकारी ऋषिकेश कुंभार यांनी उमदी येथील गणपती कृषी केंद्रावर छापा टाकून तेथील १ कोटी ५१ लाख ५३२ रूपये किमतीच्या ‘झाम्प्रो’ बुरशीनाशकांवर विक्री बंदीचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी धनाजी पाटील आणि मिरज पंचायत समितीचे अधिकारी बारावकर यांनीही बुधवारी सलगरे येथील धानेश्वरी कृषी केंद्राला भेट दिली.
याठिकाणी ‘झाम्प्रो’च्या ४०० मि.लिच्या ३०० बाटल्या सापडल्या असून, त्यांची किंमत ४ लाख ८१ हजार २०० रुपये आहे. एक लिटरच्याही दीडशे बाटल्या सापडल्या असून, त्यांची किंमत ५ लाख ८८ हजार ७५० रुपये आहे. सर्व औषधांवर विक्री बंदीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
सुभाषनगरमध्ये ३४ हजारांच्या खताला विक्रीबंदी
सुभाषनगर येथील गोविंद फर्टिलायझर्सला जिल्हा गुणनियंत्रक डी. एस. शिंगे यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी तेथे १९:१९:१९, १३:०:४५ यासह पाच कंपनीच्या ३२५ किलो दाणेदार खताची विक्री सुरू होती. विक्रेत्याकडे खत विक्रीचा परवाना नसल्यामुळे तेथील ३४ हजार ७१५ रुपये खतावर विक्री बंदीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिंगे यांनी दिली.