सांगलीत १९ दुचाकी जप्त; तिघांना अटक
By Admin | Updated: August 17, 2014 00:44 IST2014-08-17T00:40:35+5:302014-08-17T00:44:38+5:30
एलसीबीची कारवाई : सांगली, इस्लामपूर, इचलकरंजी, मुंबईतून चोरी; कोठडीत रवानगी

सांगलीत १९ दुचाकी जप्त; तिघांना अटक
सांगली : सांगली, कोल्हापूर व मुंबई येथून दुचाकी चोरुन त्याची अवघ्या पाच हजारापासून ते दहा हजारात विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. टोळीकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत ७ लाख दहा हजार रुपये आहे.
अटक केलेल्यांमध्ये विनायक ऊर्फ छोट्या ऊर्फ पप्या सुभाष पाटोळे (वय २३, रा. आंबेडकरनगर, साखराळे, ता. वाळवा), गुरुप्रसाद सुरेश खांडके (२३, दुर्गा अपार्टमेंट, मंत्री कॉलनी, सरकारी दवाखान्यामागे, वाळवा) व शशिकांत ऊर्फ बाळू दिनकर देसाई (२३, हनुमाननगर, इस्लामपूर) यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात पुण्यात बॉम्बस्फोट करण्यासाठी दुचाकीचा वापर करण्यात आला होता. स्फोटात वापरण्यात आलेली ही दुचाकी कऱ्हाड येथील एका पोलिसाची चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.
या विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, उपनिरीक्षक संदीप चव्हाण, हवालदार दीपक पाटील, अशोक डगळे, शंकर पाटील, कुलदीप कांबळे, उदय माळी, अझर पिरजादे, चेतन महाजन, चालक सचिन सूर्यवंशी व काबुगडे यांचे पथक सांगलीवाडीत गस्त घालत होते. तेथील जकात नाक्याजवळ संशयित तिघेही एकाच दुचाकीवरुन भरधाव वेगाने जाताना आढळून आले. त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली, त्यावेळी त्यांनी दुचाकी चोरीसाठी फिरत असल्याची कबुली दिली.
गेल्या वर्षभरापासून ते दुचाकी चोरी करीत आहेत. विनायक पाटोळे हा त्यांचा म्होरक्या आहे. सांगली शहर, सांगली ग्रामीण, इस्लामपूर या तीन पोलीस ठाण्यासह त्यांनी इचलकरंजी व मुंबईतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुचाकींची त्यांनी पाच हजारापासून ते दहा हजारात विक्री केली होती. दुचाकी खरेदी करणाऱ्या १९ जणांची नावे निष्पन्न झाली. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दुचाकी खरेदी केल्याचे सांगितले. या सर्वांना साक्षीदार करण्यात येणार आहे. केवळ चैनीसाठी त्यांनी चोरीचा हा मार्ग अवलंबला आहे. ते प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत.
संशयितांचा जामीन फेटाळला
अटकेत असलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (शनिवार) संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर संशयितांनी न्यायाधीश श्रीमती एम. आर. यादव यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तिघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. यावेळी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील एस. एम. पखाली यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर तीनही संशयितांची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यांनी अणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)