सांगलीत रंगली ‘सूर पहाटे’ची मैफल
By Admin | Updated: March 22, 2015 00:24 IST2015-03-22T00:24:17+5:302015-03-22T00:24:17+5:30
गुढीपाडवा : रोटरी क्लबसह विविध मंडळांकडून नववर्षाचे स्वागत

सांगलीत रंगली ‘सूर पहाटे’ची मैफल
सांगली : गुढीपाडव्यानिमित्त आज, शनिवारी पहाटे स्वरगंधित करणारी ‘सूर पहाटेची मैफल’ रंगली. या मैफलित नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. रोटरी क्लब आॅफ सांगली, विश्वजागृती मंडळ, अॅक्टीव्ह ग्रुप, रंगवेध, संगीत साधना, देवल स्मारक, संस्कार भारती अशा सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था एकत्रित येऊन गेली १९ वर्षे हा उपक्रम राबवित आहेत.
पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या सूर पहाटेच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पं. ऋषिकेश बोडस यांनी तोडी राग, तराना व अभंग गाऊन अवघे वातावरण स्वरांनी भारून टाकले. ज्येष्ठ गायक विजयराव कुलकर्णी, उभरता गायक कलाकार सुकृत ताम्हणकर, सौ. भक्ती साळुंखे-लाटवडे, सौ. अमृता धारप (पनवेल), कु. अंकिता आपटे यांनी भक्ती व भावरसांची लोकप्रिय गाणी सादर करून सूर पहाटेचे या कार्यक्रमाची रंगत वाढवत नेली. ज्येष्ठ हार्मोनियमवादक भास्कर पेठे यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले होते. त्यांना प्रशांत भाटे (सिंथेसायझर), परेश पेठे (तबला), सुशांत कुलकर्णी (तालवाद्ये), कु. मनाली रानडे (बासरी) यांनी साथसंगत केली.
‘तेजोनिधी लोक गोल’, ‘आनंदी आनंद’, ही गाणी विजयराव कुलकर्णी यांनी सादर केली, तर सुकृत ताम्हणकर यांनी ‘मलयगिरीचा चंदन गंधीत’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘त्रिवार जयजयकार’ ही गाणी सादर केली. भक्ती साळुंखे लाटवडे यांनी ‘घनरानी साजणा’, ‘त्या चित्त चोरट्याला’ ही गाणी प्रभावीपणे सादर केली, तर सुकृत ताम्हणकर यांच्या साथीने ‘बाजेरे मुरलिया बाजे’, हे युगलगीतही सादर केले. या कार्यक्रमासाठी अरुण दांडेकर, महेश कराडकर, प्रकाश आपटे, सती भोरे, सुहास पावसकर, सनीत कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, ए. आर. जोशी आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)