संदीप घुगे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नतीने पुण्याला बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 01:17 PM2024-02-01T13:17:16+5:302024-02-01T13:17:59+5:30

सांगली : सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची ...

Sandeep Ghuge Sangli new Superintendent of Police, Dr. Basavaraj Teli transferred to Pune on promotion | संदीप घुगे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नतीने पुण्याला बदली

संदीप घुगे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नतीने पुण्याला बदली

सांगली : सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नत्तीने पुणे येथे बदली झाली आहे. राज्य शासनाने बुधवारी रात्री याबाबतचे आदेश दिले. दरम्यान, घुगे हे आज, गुरुवारी पदभार स्वीकारणार आहेत.

डॉ. तेली यांनी २० ऑक्टोबर २०२२ रोजी अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकालात नूतन पोलिस अधीक्षक कार्यालयातून कामकाज सुरू झाले. याशिवाय जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर त्यांनी चांगलीच कारवाई केली होती. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पथकाने मिरज शहरात कारवाई करत पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदलीही केली होती.

संपूर्ण राज्यात गाजलेल्या रिलायन्स ज्वेल्स या पेढीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा आव्हानात्मक तपास करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना जेरबंद करण्यात आले होते. शहरात बीट मार्शल ही अनोखी संकल्पना राबवत त्यांचे मोबाइल क्रमांक जनतेसाठी खुले करण्यात आले होते. याचा सर्वसामान्य नागरिकांना चांगला फायदा झाला होता. सांगलीत असतानाच त्यांना वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती. आता गुन्हे अन्वेषण शाखेचे उपमहानिरीक्षक या पदावर पदोन्नतीने त्यांची पुणे येथे बदली झाली आहे.

सांगलीत नियुक्ती मिळालेले घुगे हे यापूर्वी अकोला येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी पदभार घेणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शिस्तप्रिय अधिकारी 

अधीक्षक म्हणून नियुक्त झालेले संदीप घुगे यांचे बीई (मॅकेनिकल) शिक्षण झाले असून, ते २०१५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. प्रशिक्षणानंतर रायगड येथे त्यांनी प्रशिक्षणाला सुरूवात केली. त्यानंतर धाराशिव येथे सहायक अधीक्षक, मालेगाव (जि. नाशिक) येथे अपर अधीक्षक यानंतर नवी मुंबई व अकोला येथे अधीक्षक म्हणून काम केले आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

Web Title: Sandeep Ghuge Sangli new Superintendent of Police, Dr. Basavaraj Teli transferred to Pune on promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली