वाळू चोरीचा अजब फंडा
By Admin | Updated: March 11, 2016 23:26 IST2016-03-11T23:21:01+5:302016-03-11T23:26:26+5:30
तासगावात प्रशासनाकडून भांडाफोड : वाळू ट्रकवर दगडी चुऱ्याचा थर; ट्रक जप्त

वाळू चोरीचा अजब फंडा
तासगाव : बेकायदा वाळू वाहतुकीबाबत तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले आणि त्यांच्या टीमने तालुक्यात धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे तालुक्यात सहजासहजी बेकायदा वाळू वाहतूक होत नाही. मात्र शुक्रवारी अजब फंडा वापरुन होणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीचा भांडाफोड झाला. वाळूने भरलेल्या ट्रकमध्ये वाळूच्या वरील बाजूस दगडी चुऱ्याचा थर देऊन या चुऱ्याची वाहतूक होत असल्याचे भासवण्यात येत होते. या ट्रकचा भांडाफोड प्रशासनाकडून केला.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता पलूसहून तासगावच्या दिशेने पोपट जमदाडे (पलूस) यांचा डम्पर (क्र. एमएच १० एमएच ५२४४) जात होता. या डम्परच्या वाहतुकीबाबत संशय आल्यानंतर अव्वल कारकुन सुनील चव्हाण यांनी डम्पर चालकास विचारणा केली. डम्परमधून स्टोन क्रेशरवरील दगडी चुऱ्याची वाहतूक केली जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र शंका आल्याने डम्पर थांबवून तपासणी करण्यात आली. डम्परच्या वरील बाजूचा दगडी चुऱ्याचा थरा बाजूला सारला असता, खालील बाजूस वाळू असल्याचे निदर्शनास आले.
या आठवड्यात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या पाच जणांना सहा लाख एक हजार ७४० रुपयांचा दंड आकारल्याची माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली. (वार्ताहर)
पावतीही बोगस
डम्परधारकाकडे असलेली वाहतुकीची पावती बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा डम्पर जप्त करुन ८१ हजार ३९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अव्वल कारकुन सुनील चव्हाण, मंडल अधिकारी ओमासे, तलाठी कीर्तीकुमार धस, दीपक वायदंडे, आर. एच. पवार, टी. एस. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.