कोरडा, बोर नदीत वाळु तस्करी जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:18+5:302021-02-15T04:23:18+5:30
जत : जत तालुक्यातील कोरडा व बोर नदीपात्रातील वाळू उपसा करण्याची निविदा शासनाकडून अद्याप काढण्यात आलेली नाही. परंतु, बेकायदेशीर ...

कोरडा, बोर नदीत वाळु तस्करी जोमात
जत : जत तालुक्यातील कोरडा व बोर नदीपात्रातील वाळू उपसा करण्याची निविदा शासनाकडून अद्याप काढण्यात आलेली नाही. परंतु, बेकायदेशीर वाळू उपसा येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला महसूल विभागाचा आशीर्वाद व पोलिसांचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल वाळू तस्करांकडून बुडवला जात आहे.
तालुक्यात बोर व कोरडा या दोन प्रमुख नद्या आहेत. येथे फक्त पावसाळ्यातच पाण्याचा प्रवाह सुरू असतो. इतरवेळी येथे पाण्याचा प्रवाह नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांकडून वाळूचा उपसा केला जात आहे. या वाळू तस्करीला महसूल विभागाचा आशीर्वाद व पोलीस खात्याचे संरक्षण मिळत असल्यामुळे बिनदिक्कत हा व्यवसाय दिवसाढवळ्या व रात्री-अपरात्रीही सुरू असल्याचा आरोप नदीपात्रालगत असलेले शेतकरी व नागरिकांतून केला जात आहे. कधीतरी लहान वाहनांवर जुजबी कारवाई केली जात आहे. इतरवेळी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान कोरडा नदीपात्रातून वाळू उपसा करून वाळेखिंडीखालील कुटे - टोणे वस्ती येथे एक ट्रॅक्टर वाळू भरून निघाला होता, तेव्हा तलाठ्यांनी त्याला जिल्हा परिषद शाळेजवळ अडवले होते. मात्र, या ट्रॅक्टरविरोधात कारवाई न करताच सोडून दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून होत आहे. या ट्रॅक्टरविरोधात सहा महिन्यांपूर्वी एक लाख पन्नास हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. दोन महिने हा ट्रॅक्टर तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची वाळेखिंडीसह शेगाव जिल्हा परिषद गटात जोरदार चर्चा सुरू आहे.
चौकट
माहिती फुटते
बेकायदेशीर वाळू तस्करीत कोतवाल, गावकामगार, तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांची साखळी कार्यरत आहे. विशेष पथकाकडून कारवाई होण्यापूर्वीच याची माहिती वाळू तस्करांना मिळत आहे. त्यामुळे कडक व कठोर कारवाई केली जात नाही.