कॉँग्रेसचे इच्छुक बंडाच्या पवित्र्यात
By Admin | Updated: September 25, 2014 00:22 IST2014-09-24T23:35:15+5:302014-09-25T00:22:37+5:30
नेत्यांना साकडे : मिरजेचा उमेदवार बदला

कॉँग्रेसचे इच्छुक बंडाच्या पवित्र्यात
मिरज : काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी स्थानिक विरुध्द बाहेरचा या वादात पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम समर्थक सिध्दार्थ जाधव यांनी बाजी मारल्याने, काँग्रेस पक्षात संघर्ष निर्माण झाला आहे. मिरजेतील काही इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आज (बुधवारी) मदन पाटील व पालकमंत्री पतंगराव कदम यांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली.
मिरजेत काँग्रेस उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावण्यात आली होती. अॅड. सी. आर. सांगलीकर, आनंद डावरे या इच्छुकांविरोधात मिरजेतील काँग्रेस इच्छुकांनी एकत्र येऊन, स्थानिकांपैकी कोणालाही उमेदवारी देण्याची मागणी केल्याने, स्थानिक विरुध्द बाहेरचा हा वाद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला.
माजी मंत्री प्रतीक पाटील, मदन पाटील यांनी अॅड. सी. आर. सांगलीकर यांच्या उमेदवारीचे समर्थन केल्याने अॅड. सांगलीकर यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. सांगलीकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे गृहीत धरून काँग्रेसचे गतवेळचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे. मात्र पालकमंत्री कदम यांनी आज जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने सांगलीकर समर्थक व इतर इच्छुकांना मोठा धक्का बसला. सांगलीकर यांचे समर्थक असलेले काही नगरसेवक, पूर्व भागातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी माजी मंत्री मदन पाटील व पालकमंत्र्यांकडे धाव घेऊन काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची मागणी केली. सांगलीकर यांचे समर्थक, उमेदवार बदलणार असल्याचा दावा करीत होते, तर सिध्दार्थ जाधव समर्थकांनी उमेदवारी मिळाल्याबद्दल जल्लोष केला.
गतवेळी माजी मंत्री प्रतीक पाटील समर्थक बाळासाहेब होनमोरे यांना उमेदवारी मिळाली होती, मात्र यावेळी पालकमंत्री पतंगराव कदम समर्थक सिध्दार्थ जाधव यांना उमेदवारी मिळाल्याने, राजकीय समीकरणे बदलली आहेत. जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने बाळासाहेब होनमोरे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. (वार्ताहर)
कलह उफाळला
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद डावरे निवडणूक लढविण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. अॅड. सांगलीकर अद्याप उमेदवारी मिळेल याच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांनी बंडखोरीबाबत अद्याप भाष्य केलेले नाही. जाधव यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे मिरजेत काँग्रेसअंतर्गत बंडखोरीची चिन्हे आहेत.