साठ कोटींच्या कामांना मंजुरी

By Admin | Updated: May 30, 2014 01:05 IST2014-05-30T01:05:20+5:302014-05-30T01:05:30+5:30

स्थायी समिती सभा : महापालिका अधिकार्‍यांवर सदस्यांचा संताप

Sanctioning of 60 crores works | साठ कोटींच्या कामांना मंजुरी

साठ कोटींच्या कामांना मंजुरी

सांगली : शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीसह एकूण ६० कोटी रुपयांच्या विकासकामांना आज, गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. मंजूर झालेल्या एकूण ५४६ कामांमध्ये ४० कोटींची हॉटमिक्सची कामे असल्याची माहिती सभापती राजेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राजाभाऊ जगदाळे सभागृहात ही सभा पार पडली. आचारसंहिता संपल्यानंतरची ही पहिलीच सभा होती. शहरातील ठप्प असलेल्या विकासकामांबाबत सदस्यांनी संताप व्यक्त केला. या गोष्टीस अधिकार्‍यांचा नाकर्तेपणाच जबाबदार असल्याची टीका सदस्यांनी केली. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्‍यांचे मूल्यमापन केल्यास महापालिकेस त्यांचा कोणताही फायदा नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या अधिकार्‍यांना परत पाठवा, अशी मागणीही करण्यात आली. आयुक्त अजिज कारचे यांनी सांगितले की, यासंदर्भात महासभेच्या ठरावाची गरज आहे. तसा ठराव केल्यास त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त केली. सभेत एकूण ६० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये ४० कोटींची हॉटमिक्सची व अन्य २० कोटींच्या कामांचा समावेश आहे. तातडीने ही कामे मार्गी लावण्याचे आदेश सभापती नाईक यांनी दिले. शहरातील चरी खुदाईप्रकरणीही सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. शहरभर मातीचे ढिगारे व खोदलेले खड्डेच दिसत असल्याने संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी एका ठेकेदाराला नोटीस बजावल्याचे आयुक्तांनी सांगितले. ज्याठिकाणी चरी खुदाई व खड्डे बुजविण्याबाबत हलगर्जीपणा झाला असेल, त्याठिकाणी संबंधित अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. रस्ते, पॅचवर्क कामांच्या दर्जा नियंत्रणाचा मुद्दाही चर्चेत आला. सदस्य सुरेश आवटी यांनी मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पॅचवर्कच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वसंत व्याख्यानमालेच्या आयोजनाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. वसंत व्याख्यानमाला घेत असताना मिरजेतील शारदीय व्याख्यानमाला का बंद आहे, असा सवाल मिरजेतील सदस्यांनी उपस्थित केला. व्याख्याते व कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत परस्पर निर्णय घेतले जात असल्याने एक समिती नेमण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली. या सर्व मुद्यांचा विचार करून पुढील स्थायी समिती सभेत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Sanctioning of 60 crores works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.