जत प्रादेशिक नळ योजनेस मंजुरी द्या
By Admin | Updated: May 13, 2016 00:16 IST2016-05-12T23:00:57+5:302016-05-13T00:16:00+5:30
पंचायत समिती मासिक सभा : तालुका विभाजनाच्या मागणीसह विविध ठराव मंजूर

जत प्रादेशिक नळ योजनेस मंजुरी द्या
जत : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ७५ गावांसाठी नगाराटेक (जत) प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी देऊन त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी. जत तालुक्याचे विभाजन करणे, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करावे आदी मागण्यांचे ठराव गुरुवारी जत पंचायत समितीच्या मासिक सभेत एकमताने संमत करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप होते.
जत पंचायत समिती रोजगार हमी योजना विभागातील सर्वच कंत्राटी कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत. कामाच्या चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यशवंत हिप्परकर यांनी सभागृहात केली असता, या सर्वच कर्मचाऱ्यांची येथून तात्काळ एकतर्फी बदली करण्यात यावी, त्यांच्या जागेवर जत तालुक्यातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, असा ठराव संमत करण्यात आला.
जत ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना व्यवस्थित रुग्णसेवा मिळत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात येथील महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याशिवाय रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीमधील अनुदानात सहा लाख रुपयांचा अपहार झाला आहे. अपहार करणारा कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून गायब आहे. शवविच्छेदन वेळेत केले जात नाही. मृतदेह कवठेमहांकाळ येथे घेऊन येण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होत आहे, असा आरोप संजय कांबळे व अजित पाटील यांनी केला असता, तीन वर्षापेक्षा जादा काळ येथे कार्यरत असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व मृतदेहांची विटंबना करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असा ठराव संमत करण्यात आला.
सोन्याळ (ता. जत) येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम २०१३ मध्ये पूर्ण झाले आहे. हे काम निकृष्ट आहे, बिल काढू नये, म्हणून जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे व पंचायत समिती सदस्य बसवराज बिराजदार यांनी तक्रार केली होती. या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता नव्हती आणि मोजमाप दिले आहे. पंचायत समिती शाखा अभियंता एस. डी. कांबळे व ग्रामसेवक संगाप्पा बसर्गी यांनी संगनमत करून या कामात अपहार केला आहे, अशी तक्रार व्हनमोरे यांनी केली असता, कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असा ठराव संमत करण्यात आला आहे.
यावेळी शेती, वीज वितरण, सामाजिक वनीकरण, वन विभाग, आरोग्य, दळण-वळण आदी विषयांवर चर्चा झाली. तम्मा कुलाळ, अरविंद गडदे, सोमाण्णा हाक्के, राजू चौगुले, लक्ष्मण बोराडे आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.
प्रांताधिकारी अशोक पाटील, तहसीलदार अभिजित पाटील, अॅड़ श्रीपाद आष्टेकर, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, जि. प. सभापती संजयकुमार सावंत, बसवराज पाटील व पवार, शिवाप्पा तावशी, मारुती पवार, यशवंत दुधाळ, माणिक वाघमोडे, अशोक सांगलीकर, नगरसेवक उमेश सावंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांनी प्रास्ताविक केले, आमदार विलासराव जगताप यांनीही मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
रामपूर-मल्लाळमधील कामांची चौकशी
रामपूर-मल्लाळ ग्रुप ग्रामपंचायतीने रोहयोअंतर्गत ३६ हजार इतकी वृक्ष लागवड केली असली तरी, सध्या जागेवर फक्त १० हजार रोपे आहेत. यासंदर्भात तक्रार होऊनही चौकशी सुरू झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यातच झाडांसाठी खड्डे काढून त्यात रोपे लावण्याचे काम सुरू आहे. ग्रामसेविका स्वाती मस्के मनमानी कारभार करत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय कामात गैरवहार करून आर्थिक स्वार्थ साधला आहे. त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच बिराप्पा माने यांनी केली असता, या संपूर्ण कामाची चौकशी करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी दिले.
जत पंचायत समितीची आमसभा गुरूवारी झाली. आ. विलासराव जगताप यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने सभेस सुरूवात झाली. यावेळी प्रांताधिकारी अशोक पाटील, तहसीलदार अभिजित पाटील, संजयकुमार सावंत, लक्ष्मण बोराडे आदी उपस्थित होते.