‘सनातन’ने प्रकाश आंबेडकरांविरुद्ध तक्रार द्यावीच
By Admin | Updated: October 1, 2015 00:42 IST2015-09-30T23:39:37+5:302015-10-01T00:42:19+5:30
गौतमीपुत्र कांबळे : सामना करण्यास डाव्या चळवळीचे कार्यकर्ते सज्ज

‘सनातन’ने प्रकाश आंबेडकरांविरुद्ध तक्रार द्यावीच
सांगली : सनातन संस्थेवर बंदीची मागणी तसेच डाव्यांकडेही नक्षलवाद असल्याचा इशारा दिल्याबद्दल अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध सनातन संस्थेला तक्रार द्यायची असेल, तर त्यांनी द्यावी. त्यांच्या या गोष्टीचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशारा सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जाती मुक्ती आंदोलनाचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
सनातन संस्था जर मारामारी, धमक्या, हिंसा, खून अशी भाषा करीत असेल, तर डाव्यांकडेही नक्षलवाद आहे, हे विसरू नये, असा इशारा काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. कांबळे म्हणाले की, या वक्तव्याबद्दल जर सनातन संस्थेस तक्रार करायची असेल, तर त्यांनी लवकर करावी. आमची संघटना त्याचा सामना करण्यास तयार आहे. सनातन संस्थेचे साधक वेगवेगळ्या हिंसाचार प्रकरणात अडकले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणीही त्यांचाच साधक संशयित म्हणून सापडला आहे. त्यांनी हिंसा अशीच चालू ठेवली, तर हिंसेला हिंसेने उत्तर देणारे लोक या समाजात तयार होतील. नंतर या गोष्टी कोणालाच रोखता येणार नाहीत, असेही मत आंबेडकर यांनी मांडले होते. बंदीच मागणीबाबत सनातनने तक्रार करून दाखवावीच, असे आव्हानही देण्यात आले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, गौतम लवटे, कॉ. उमेश देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)