संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरणार...
By Admin | Updated: March 8, 2015 00:20 IST2015-03-08T00:19:52+5:302015-03-08T00:20:59+5:30
मनोज आखरे : आठव्या महाअधिवेशनास सांगलीत सुरुवात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार

संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरणार...
सांगली : इतर बऱ्याच पक्ष, संघटनांनी राजकारणात जे कपटकारण केले ते आमची संघटना कधीही करणार नाही. भविष्यात संभाजी ब्रिगेडला समाजकारणाचा विचार घेऊन राजकारणात उतरावे लागेल, असेही स्पष्ट संकेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी आज (शनिवारी) संघटनेच्या महाअधिवेशनात दिले.
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सांगलीत आठव्या राज्य महाअधिवेशनास आज सुरुवात झाली. उद्घाटनाच्या सत्रात प्रदेशाध्यक्ष आखरे म्हणाले की, ब्राह्मणी प्रतिगामी विचार पुन्हा प्रबळ होऊ पहात आहेत. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी आता ब्रिगेडला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. आपण मैदानात उतरलो नाही, तर आपल्याला गोळ््या घातल्या जातील. हिंमत असेल तर भ्याड हल्ला करणाऱ्या ब्राह्मणी व्यवस्थेने रस्त्यावर यावे, आम्हीही रस्त्यावर येऊ. कोणात किती बळ आहे, ते दिसून येईल. ब्रिगेडवर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. ही संघटना हिंसेचा पुरस्कार करणारी आहे, असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात अन्यायाविरोधात लढण्याला हिंसा म्हटले जात नाही. शहीद भगतसिंगांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे न्याय्य हक्कासाठी आम्ही लढत राहू. ‘अडवा आणि जिरवा’ या पद्धतीला आम्ही राजकारणाऐवजी कपटकारण असे म्हणतो. समाजकारणालाच राजकारण समजणाऱ्या शिवरायांचे विचार घेऊन आम्ही राजकीय मैदानात उतरू.
आ. जगन्नाथ शिंदे म्हणाले की, ब्रिगेडने दुय्यम श्रेणीतील नोकऱ्यांमध्येही बहुजन समाजाची मुले समाविष्ट व्हावीत, त्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर केवळ नोकऱ्यांवरच विसंबून न राहता स्वयंरोजगारातून समाजातील तरुणांनी स्वत:ला सिद्ध करावे. अन्य धर्माचा आदर करूनच राजकारणात काम केले पाहिजे.
मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे म्हणाले की, राजकारणात काम करताना अन्य राजकीय पक्षांनी व नेत्यांनी केले त्याच गोष्टी अपेक्षित नाहीत. समाजकारणाच्या दृष्टीने त्यांनी राजकारणात उतरावे. तरुणांचा केवळ आर्थिक विकास करून चालणार नाही. त्यांच्या सर्वंकष विकासाचे धोरण स्वीकारून काम करावे. राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांनीही भाषण केले. महापालिका विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी आमदार हाफिज धत्तुरे, डॉ. संजय पाटील, स्वागताध्यक्ष तथा उद्योजक सतीश चव्हाण, दिनकर पाटील, पप्पू पाटील-भोयर, निर्मला पाटील, श्रीरंग पाटील, सौरभ खेडेकर उपस्थित होते.
ब्राह्मणवाद्यांकडूनच पानसरेंची हत्या
कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, शहीद अशोक कामटे, विजय साळसकर यांच्या हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केल्या आहेत, असा गंभीर आरोप ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी यावेळी केला. आम्ही ब्राह्मणवाद्यांविरोधात रस्त्यावर उतरलो नाही, तर आमचाही अशाचपद्धतीने बळी जाईल, असेही ते म्हणाले.
विचारांची संस्कृती हवी
महापौर विवेक कांबळे म्हणाले की, ज्यावेळी आम्ही चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करीत होतो, त्यावेळी काही ब्राह्मणवाद्यांनी आम्हाला विरोध केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रतिगामींना विरोध करण्याचा जो विचारांचा मार्ग दाखवून दिला आहे, त्या विचाराची संस्कृती घेऊन पुढे गेले पाहिजे.