मजुराघरच्या बुद्धिमत्तेला शैक्षणिक साहित्याच्या मदतीमधून सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:00+5:302021-07-01T04:19:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : श्रीमंती, गरिबी, धर्म, जात पाहून गुणवत्ता, बुद्धिमत्ता नांदत नाही. शैक्षणिक वातावरणातील घरांमध्ये बुद्धीमत्तेची चुणूक ...

मजुराघरच्या बुद्धिमत्तेला शैक्षणिक साहित्याच्या मदतीमधून सलाम
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : श्रीमंती, गरिबी, धर्म, जात पाहून गुणवत्ता, बुद्धिमत्ता नांदत नाही. शैक्षणिक वातावरणातील घरांमध्ये बुद्धीमत्तेची चुणूक नेहमीच दिसते; पण दारिद्र्याच्या खस्ता खाणाऱ्या घरांमध्येही उमलणारी गुणवत्तेची फुले लक्षवेधी ठरतात. शैक्षणिक साधनांच्या मदतीतून अशा फुलांचा बहर फुलविण्याचा उपक्रम सांगलीत पार पडला.
शिक्षणक्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या डॉ. नितीन नायक यांनी आजवर अनेक मुलांच्या शैक्षणिक कार्यासाठी मदतीचा हात दिला आहे. कुपवाडमधील बाळकृष्णनगर हा त्यांच्या फार्महाऊस शेजारचा परिसर आहे. तेथील एका झोपडीत पांढरे कुटुंबीय राहतात. आई-वडील दिवसभर मजुरीसाठी जातात तर त्यांची दोन मुले घरीच असतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील हमाली करतात तर आई फाउंड्रीमध्ये काम करते. मुलगा महेश व त्याची मोठी बहीण मयुरी दोघेही अत्यंत हुशार आहेत. महेशला लष्करात जायचे आहे. मयुरीला सर्व स्वयंपाक तर येतोच; पण ती रांगोळी व मेहंदी उत्तम काढते. गायनातही ती उत्तम आहे.
या मुलांशी संवाद साधण्यासाठी नितीन नायक त्यांच्या घरी गेले. ऑनलाइन शिक्षण चालू आहे; पण मोबाइल नसल्याचे त्यांना समजले. घरी टीव्ही, रेडिओ नाही. नायक यांनी या मुलांना मदत करण्याचे ठरविले. मुलीला त्यांनी सायकल घेऊन दिली. मोबाइल देण्यासाठी रोटरी क्लबमधील मित्रांना विनंती केली. लोकांनी त्यांच्याकडे मोबाइल आणून दिला. तो त्यांनी मयुरीला अभ्यासासाठी दिला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
चौकट
मदत करणाराही श्रेष्ठ
मयुरीला महागडा मोबाइल देणाऱ्या नायक यांच्या मित्राने स्वत: नाव कोणालाही न सांगण्याची अट घातली. या दातृत्वाने नितीन नायकही भारावून गेले.