सलून दराच्या प्रश्नाचा सोशल मीडियावरून प्रसार!
By Admin | Updated: May 27, 2016 00:07 IST2016-05-26T23:25:06+5:302016-05-27T00:07:15+5:30
बुधगाव प्रकरण : दुकाने सुरू, पण शुकशुकाट; अन्य गावांमध्ये संदेश जात असल्याने संघर्ष पेटण्याची चिन्हे

सलून दराच्या प्रश्नाचा सोशल मीडियावरून प्रसार!
सचिन लाड --सांगली -बुधगाव (ता. मिरज) येथे ग्रामस्थ व सलून व्यावसायिकांच्या वादाचा प्रसार सोशल मीडियावरुन केला जात आहे. ‘परप्रांतीय सलून कामगार केस व दाढीसाठी केवळ ४० रुपये घेत आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बुधगावात प्रयोग यशस्वी’, असा संदेश प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे सलून दराचा बुधगावपुरता मर्यादित असलेला हा प्रश्न भविष्यात जिल्ह्यात पेटून संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांच्या बैठकीनंतर स्थानिक सलून व्यावसायिकांनी गुरुवारी दुकाने सुरु केली. पण ग्रामस्थांनी त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्या दुकानांमध्ये शुकशुकाट होता.
बुधगावमधील एक सलून व्यावसायिक व सोसायटीचे उपाध्यक्ष यांच्यात किरकोळ वादातून मारामारी झाली. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. सोसायटीच्या उपाध्यक्षावर कारवाई करावी, या मागणीसाठी सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. चार दिवसांनंतर हे प्रकरण मिटले. पण १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत केशकर्तन दराचा मुद्दा उपस्थित झाला. केस कापणे २५ रुपये आणि दाढी करणे १५ रुपये असे दर ग्रामसभेत ठरविले. सलून व्यावसायिकांनी ग्रामसभेतील हा निर्णय बेकायदेशीर ठरवत संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले. त्यामुळे संघर्ष वाढत गेला.
गावातील २२ सलून व्यावसायिकांची दुकाने महिनाभर बंद राहिली. यावर पर्याय म्हणून त्यांनी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील तीन सलून व्यावसायिकांना बोलावून त्यांना दुकान उघडून दिले. सलून व्यावसायिक व ग्रामस्थांमधील संघर्ष वाढत असल्याचे लक्षात येताच, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी यामध्ये लक्ष घालून हे प्रकरण तातडीने संपविण्याचे आदेश ग्रामीण पोलिसांना दिले होते.
ग्रामीणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव व नूतन निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी बुधवारी ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसभेतील ठरावानुसार दोन सलून दुकाने सुरु केली आहेत. स्थानिक व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवा किंवा सुरु करा, असे कोणी काहीच सांगितलेले नाही, असे सांगितले. पण दराच्या मुद्याला कोणीही हात घातला नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. वरिष्ठांच्या आदेशाचा मान ठेवत पोलिसांनी बैठक घेऊन हा विषय संयमाने हाताळण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
गुरुवारी आठ ते दहाच स्थानिक व्यावसायिकांनी दुकाने सुरु ठेवली. पण ग्रामस्थांनी त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने या दुकानात शुकशुकाट होता. त्यामुळे दुकाने त्यांनी पुन्हा बंद केली. सायंकाळीही तशीच स्थिती कायम होती.