मिरजेत नशेसाठी गोळ्यांची विक्री; दुकानदारास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:52+5:302021-09-03T04:26:52+5:30
मिरज : मिरज शहरात अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांचा व्यसनासाठी वापर सुरू असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले. ...

मिरजेत नशेसाठी गोळ्यांची विक्री; दुकानदारास पकडले
मिरज : मिरज शहरात अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांचा व्यसनासाठी वापर सुरू असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले. याची दखल घेत गांधी चाैक पोलिसांनी मिरजेत डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका औषध दुकानदारास पकडले.
मानसोपचारासाठी वापर होत असलेल्या औषधी गोळ्यांची मिरजेत अवैध विक्री सुरू असून, अनेक तरुण या औषधी गोळ्यांची नशा करत आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून गुन्हेगारी कृत्ये सुरू आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या देण्यास प्रतिबंध असतानाही या औषधांची राजरोस अवैध विक्री सुरू आहे.
मिरजेत गुरुवारी स्टेशन चौक परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे पोलिसांना नशेसाठी वापर होणाऱ्या औषधी गोळ्या सापडल्या. याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने मिरजेतील सांगली रस्त्यावर आयुष स्वस्त जेनरिक औषध दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित नशेच्या गोळ्या आणत असल्याचे सांगितले.
पोलीस पथकाने पंचांना बोलावून संबंधित आरोपीस पाचशे रुपये देऊन त्या औषध दुकानातून आणखी नशेच्या गोळ्या आणण्यास सांगितले. त्याने आयुष स्वस्त जेनरिक मेडिकलमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेच्या ४० गोळ्या असलेली चार पाकिटे आणली. यानंतर त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी पंचांसह औषध दुकानात जाऊन खात्री केली असता, औषध दुकानदाराने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित नशेच्या गोळ्या दिल्याचे कबूल केले.
सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी औषध निरीक्षक विकास पाटील यांना पाचारण करुन संबंधित औषध दुकानावर कारवाईच्या सूचना दिल्या. यापुढेही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित नशेच्या गोळ्या देणाऱ्या औषध दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. डी. पवार, आर. एस. अन्नछत्रे, अमर मोहिते, चंद्रकांत गायकवाड, रिचर्ड स्वामी, अमोल आवळे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
Attachments area