नातेवाईकांच्याच नावे घेतला पगार

By Admin | Updated: August 31, 2014 23:35 IST2014-08-31T22:48:06+5:302014-08-31T23:35:44+5:30

जत तालुक्यातील चित्र : युपीएस वाटपात गोलमाल

Salary took place in the name of relatives | नातेवाईकांच्याच नावे घेतला पगार

नातेवाईकांच्याच नावे घेतला पगार

जयवंत आदाटे - जत -जत पंचायत समिती संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या विभागाच्यावतीने देण्यात येणारा युपीएस (बॅटरी बॅकअप्) ११६ पैकी ५८ ग्रामपंचायतींना देण्यात आला नाही. हे युपीएस संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी यांच्या घरात आहेत असे समजते. एका युपीएसची किंमत सर्वसाधारणपणे वीस हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे युपीएस वाटपात अकरा लाख साठ हजार रुपयांचा गोलमाल करण्यात आला आहे, अशी चर्चा पं. स. ग्रामपंचायत विभागात दबक्या आवाजात केली जात आहे.
संग्राम विभागामार्फत पंचायत समितीसाठी दोन इनव्हर्टर संच आले होते. परंतु ते पं. स.ला देण्यात आले नाहीत. पं. स. मधील प्रत्येक विभागाने स्वखर्चाने इनव्हर्टर बसवून संगणकाचे काम सुरू केले आहे. एक हजार लोकसंख्या असलेल्या गावासाठी एक संगणक डेटा आॅपरेटर नियुक्त करावा, असा शासकीय नियम आहे. परंतु संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी यांनी चार-पाच गावांसाठी एक डेटा आॅपरेटर नियुक्त केला आहे. ग्रामपंचायतीची संपूर्ण कामे हे डेटा आॅपरेटर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन करीत नाहीत. संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवकांकडून दफ्तर मागवून घेऊन पंचायत समिती संग्राम कार्यालयात बसूनच काम केले जात आहे. याचा त्रास ग्रामसेवकांना व ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीमध्ये डेटा आॅपरेटर म्हणून कोण काम करत आहे, याची माहिती सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवकांना नसते. परंतु त्यांचा मासिक पगार नियमित काढला जात आहे. ग्रामसेवकांनी डेटा आॅपरेटरची मागणी केल्यानंतर, तुमचे दफ्तर येथेच आणा असे त्यांना सांगितले जाते. दफ्तर वेळेत देऊनही डेटा आॅपरेटरची संख्या कमी असल्यामुळे वेळेत माहिती आॅनलाईन अपलोड होत नाही. त्यानंतर अधिकारी ग्रामसेवकांच्या विरोधात तक्रार करत आहेत.
एका डेटा आॅपरेटरकडे तीन—चार ग्रामपंचायतींची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे जादा कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यांनी जादा काम करण्यास नकार दिला, तर तुमची इतरत्र बदली करतो किंवा तुम्हाला कामावरून कमी करतो, अशी भीती घालून त्यांच्याकडून जादा काम संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी करून घेत आहेत. संग्राम विभागात सध्या कार्यरत असलेल्या डेटा आॅपरेटरच्या यादीत पुकार आवटी यांचे जवळचे नातेवाईक असलेल्यांची जादा नावे आहेत. हे नातेवाईक प्रत्यक्ष कामावर येत नाहीत. त्यांचे काम इतर डेटा आॅपरेटरना करावे लागत आहे. परंतु त्यांचा मासिक पगार मात्र पुकार आवटी घेत आहेत. या डेटा आॅपरेटर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास येथील गैरकारभार उजेडात येणार आहे. (उत्तरार्ध)

शासनाची फसवणूक...
संग्राम विभागाच्यावतीने तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला मागील तीन वर्षात संगणक प्रिंटरची शाई, स्टेशनरी, कार्टेज व इतर आवश्यक साहित्य आणि संगणक दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परंतु हे सर्व कागदोपत्री काम झाले आहे असे दाखवून त्यावर ग्रामसेवकांची सही घेऊन दरमहा लाखो रुपयांचे बिल काढून महाआॅनलाईन कंपनी व शासनाची फसवणूक जत पं. स. संग्राम विभागाकडून केली जात आहे. एखाद्या ग्रामसेवकाने अशा बनावट बिलावर सही करण्यास नकार दिला, तर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडून पुकार आवटी दबाव आणून त्याला सही करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे काही प्रामाणिक ग्रामसेवकही हतबल होत आहेत. स्थानिक पातळीवरून संग्राम विभागाला पाठीशी घातले जात असल्यामुळे त्यांची भूक जादाच वाढू लागली आहे. सांगली जिल्हा परिषदेने त्रयस्थामार्फत या विभागाची चौकशी केल्यास येथील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.

Web Title: Salary took place in the name of relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.