सई बनली पालिकेची स्वच्छता दूत
By Admin | Updated: October 6, 2015 00:35 IST2015-10-05T23:31:49+5:302015-10-06T00:35:34+5:30
सई ही मूळची सांगलीची असून तिचे शिक्षण सांगलीत झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांत तिचा सहभाग असावा, या उद्देशाने तिची निवड करण्यात आली.

सई बनली पालिकेची स्वच्छता दूत
सांगली : महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची दूत म्हणून मराठी चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिची निवड करण्यात आली आहे. सई ताम्हणकर हिनेही स्वच्छतादूत म्हणून काम करण्यास मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने राज्यस्तरीय स्पर्धेत नेहमीच अव्वल क्रमांक पटाकाविला आहे. शहरी स्वच्छता अभियानात पालिकेची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. आतापर्यंत महापालिकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महापालिकेच्या यंत्रणेमार्फत स्वच्छतेचे काम सुरूच आहे. या अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून स्वच्छतेच्या कामाचे बँ्रड अॅम्बॅसिडर म्हणून प्रख्यात अभिनेत्री सई ताम्हणकर हिची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकर हिची मुंबईत भेट घेऊन, महापालिकेसोबत स्वच्छतेच्या कामात सहभाग घेण्याची विनंती केली होती. त्याला तिने मान्यता दिली आहे, असेही पाटील यांनी सांगितले. सई ही मूळची सांगलीची असून तिचे शिक्षण सांगलीत झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांत तिचा सहभाग असावा, या उद्देशाने तिची निवड करण्यात आली. सध्या ती चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून पुढील आठवड्यात ती मुंबईत परतणार आहे. तेव्हा पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी तिची भेट घेऊन स्वच्छतेबाबतचा आराखडा तयार करतील. नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी सईसह रॅली, स्वच्छता अभियान राबविण्याचा विचार आहे. शिवाय तिच्या मार्गदर्शनाखाली एखादा प्रभाग आदर्श मॉडेल तयार करण्याचा मानस असल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)