सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:35+5:302021-09-19T04:27:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली ...

Sahitya Akademi Award for Translation to Sonali Nawangul | सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर

सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला आहे. सलमा यांच्या मूळ तमीळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. नवांगुळ यांच्या ‘जाँयस्टिक’ या ग्रंथाला दमसा सभेचा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. याशिवाय जयश्री शानभाग यांनी कोकणीत अनुवादित केलेल्या ‘स्वप्न सारस्वत’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

सोनाली नवांगुळ यांनी यापूर्वी अनेक पुस्तकांचे भाषांतर केले असून, त्या स्वतंत्र लिखाणही करतात. स्मृतिचिन्ह, ५० हजार रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सोनाली प्रकाश नवांगुळ यांचे मूळ गाव बत्तीस शिराळा. वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या सोनाली यांनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर २००० साली त्या कोल्हापुरात आल्या. त्यांनी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड’ या संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. २००७ साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन त्या संस्थेतून बाहेर पडल्या. ‘स्पर्शज्ञान’ या पहिल्या मराठी नोंदणीकृत पाक्षिकाची उपसंपादक म्हणून त्यांनी काम केले. आजही त्या अंधांसाठीच्या मराठी व हिंदी ब्रेल पाक्षिकासाठी लेखन करतात. विविध वृत्तपत्रांसाठीही त्या प्रासंगिक लेखन करतात.

चाैकट

साेनाली नवांगुळ यांची पुस्तके

अनुवादित पुस्तके : ड्रीमरनर, मध्यरात्रीनंतरचे तास, वारसा प्रेमाचा व वरदान रागाचे

लहान मुलांसाठी : जॉयस्टिक, नर्मदा बचाव आंदोलनाच्या लढाऊ कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वच्छंद

Web Title: Sahitya Akademi Award for Translation to Sonali Nawangul