वृक्ष-वल्लींचा सगासोयरा... सच्चा माणूस-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 00:55 IST2016-07-07T23:52:42+5:302016-07-08T00:55:23+5:30

या अवलिया वृक्षमित्राचं नाव आहे, प्रकाश व्यंकटराव चव्हाण.

Sagasoyra of the tree-tree ... the true man- | वृक्ष-वल्लींचा सगासोयरा... सच्चा माणूस-

वृक्ष-वल्लींचा सगासोयरा... सच्चा माणूस-

रस्त्याकडेला उगवलेल्या एखाद्या वेगळ्या झाडाची ओळख करून घ्यावी, असं वाटणारी माणसं दुर्मिळच. कॉमर्स पदवीधर झालेला एक माणूस गेली ४०-५० वर्षे ‘वृक्ष-वल्ली आम्हा सोयरे’ म्हणत भेटलेल्या प्रत्येक झाडाची विचारपूस करीत, माणसांबद्दलचं झाडांचं मत बदलण्याचा जिवापाड प्रयत्न करतो आहे. त्यांच्या घराभोवती आणि कुपवाड एमआयडीसीतील प्रकाश कॉटन इंडस्ट्रीजच्या परिसरात जगभरातल्या अडीचशे-तीनशे दुर्मिळ वृक्षांचं जणू आनंदवन झालं आहे. झाडाच्या मुळापर्यंत जाऊन त्याची प्रेमळ, कुतुहलानं विचारपूस करणाऱ्या या अवलिया वृक्षमित्राचं नाव आहे, प्रकाश व्यंकटराव चव्हाण.

पांढऱ्या पळसाच्या शोधासाठी प्रकाश चव्हाण यांनी १५ वर्षे राबविलेली शोधमोहीम ऐकून, एकदा ‘ग्रंथाली’चे दिनकर गांगल त्यांचा पत्ता शोधत त्यांना भेटायला आले. त्यांच्या कुपवाड एमआयडीसीतल्या चार एकर जागेत, येशू ख्रिस्ताला ज्याच्या लाकडापासून खिळ्यांनी क्रुसावर खिळलं, ते ‘लिग्नम व्हायटी’ नावाचं झाड आहे. रुद्राक्षाचं झाड आहे. द्रोणासारख्या पानांचा यमकस कृष्णा आहे. बाळंतकळा येण्यासाठी पूर्वी सुईणी वापरायच्या, ते कळलावी किंवा बचनाग (ग्लोरिसा सुपर्बा) आहे. कैलासपती, कदंब, समरचंद आहेत. अशोक वनात सीता ज्या झाडाखाली होती, तो पिवळा अशोक (सराका इंडिका), गौतम बुध्दांना जिथं ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष, आॅस्ट्रेलियन बदाम, हाँगकाँगच्या राष्ट्रध्वजावर ज्या झाडाची फुलं आहेत, ते बुहोनिया ब्लॅकियाना, तसेच अनेक देशी-विदेशी फळझाडे आणि फुलझाडे आहेत.
कागलचे कोगनोळे काका, विजयकुमार प्रथमशेट्टी, डॉ. गुंजाटे, सुरेश गायकवाड, पापा पाटील, राज्याच्या पार्कस् अ‍ॅन्ड गार्डन्स विभागाचे निवृत्त संचालक डॉ. एच. एस. बल अशा अनेक तज्ज्ञ माणसांनी चव्हाणांचं वनस्पतीशास्त्राचं ज्ञानभांडार अनुभवसिध्द आणि प्रगल्भ बनवलं आहे. वसंतदादा पाटील, विष्णुअण्णा, प्रकाश आमटे, विकास आमटे, मोहन धारिया, आर. आर. आबा अशा दिग्गजांनी चव्हाणांचं भरभरुन कौतुकही केलं आहे.
चव्हाणांच्या वडिलांचे स्वत:चे यंत्रमाग होते. ते परसातच झेंडूची लागवड करायचे. यासाठी प्रकाश मदत करायचे. यातूनच त्यांच्यात झाडांविषयीचं कुतूहल वाढत गेलं. त्यावेळी डॉ. पी. जी. पुरोहितांच्या पुढाकारानं सांगलीत रोझ सोसायटीची स्थापना झाली. तेथे चव्हाण यांना प्राचार्य पी. वाय. मद्वाण्णा भेटले. त्यांनी गुलाबाची सखोल माहिती दिली. पुढं डॉ. पुरोहितांच्या आकस्मिक जाण्यानं सोसायटीच्या उपक्रमांमध्ये शिथिलता आली. पण नंतर अण्णासाहेब कराळेंच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं चव्हाण आणि सर्वच संचालकांनी पुन्हा गतिमानता प्राप्त करून दिली. ग्रीन हाऊसेसच्या सहाय्यानं गुलाबाचे विक्रमी उत्पादन, जागतिक दर्जाचे ज्ञान, बाजारपेठ याविषयी रोझ सोसायटी स्वतंत्र भूमिका बजावू लागली. आजवर ४० राज्यव्यापी प्रदर्शने भरवली, स्पर्धा घेतल्या. कार्यवाह म्हणून चव्हाण यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत.
अनेक सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक संस्थांशीही ते जोडले गेले आहेत. कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ इंडस्ट्रीज, कृष्णा व्हॅली अ‍ॅडव्हान्स अ‍ॅग्रीकल्चरल फौंडेशन, कृष्णा व्हॅली क्लब, अथणी शुगर फॅक्टरी अशा संस्थांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सांगलीच्या मराठा समाज संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. वृध्द आई-वडिलांची सेवा करणाऱ्या लोकांना ‘श्रावणबाळ पुरस्कार’ तर गृहिणींना ‘माझी सून माझी लेक’ पुरस्कार देऊन गौरविण्याची संकल्पना त्यांचीच. अंधश्रध्दा निर्मूलनासाठीही ते डोळसपणे कार्यरत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी गेली सात वर्षे ते विविध उपक्रम राबवत आहेत. मराठा समाजामध्ये अंधश्रध्दा व अन्यायाविरुध्द आवाज उठविणारे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दत्ताजीराव माने यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी चव्हाण यांनी उपक्रम राबविले. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या सर्वोत्कृष्ट कार्यकर्त्याला सुवर्णपदक देऊन गौरविण्यामध्ये मराठा समाज संस्था अग्रेसर आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन, वृक्ष, पर्यावरणवादी कृतिशीलता आणि चुकीच्या चालीरीती थांबविण्यासाठीची विवेकी उपक्रमशीलता जणू प्रकाश चव्हाण यांच्या मुळापर्यंत जाण्याच्या वृत्तीचाच एक भाग आहे.
- महेश कराडकर

Web Title: Sagasoyra of the tree-tree ... the true man-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.