सदाशिवराव-पडळकर आज एका व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:18 IST2019-07-07T23:18:20+5:302019-07-07T23:18:25+5:30
दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खानापूर मतदारसंघातील कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ...

सदाशिवराव-पडळकर आज एका व्यासपीठावर
दिलीप मोहिते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : खानापूर मतदारसंघातील कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर आणि आटपाडीतील भाजपचे नेते माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख हे आज सोमवारी साळशिंगे (ता. खानापूर) येथील कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर खानापूरचे विद्यमान आ. अनिल बाबर यांच्या विरोधकांची एकत्रित गळाभेट होत असल्याने खानापूर मतदारसंघात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
साळशिंगे येथे सोमवार, दि. ८ रोजी माजी आ. सदाशिवराव पाटील व उद्योजक आनंदरावशेठ देवकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांना शालेय साहित्य व शैक्षणिक टॅबचे वाटप भाजप नेते माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख व वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी आटपाडीतील हे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
माजी आ. सदाशिवराव पाटील व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांची विट्यात गेल्या आठवड्यात बंद खोलीत तासभर चर्चा झाली. त्या चर्चेची माहिती गोपनीय ठेवण्यात आली. परंतु, सोमवारी साळशिंगे येथे माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे खंदे समर्थक असलेले उद्योजक आनंदराव देवकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पडळकर व राजेंद्रअण्णांची उपस्थिती हा सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांचे विरोधक समजले जाणाऱ्या या तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची सोमवारी एकाच व्यासपीठावर होणारी गळाभेट मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार आहे, यात शंका नाही.