राजू शेट्टी यांना पुन्हा सदाभाऊ खोत यांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:37+5:302021-08-26T04:28:37+5:30

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर इस्लामपूर येथे मोेर्चा ...

Sadabhau Khot's obstacle to Raju Shetty again | राजू शेट्टी यांना पुन्हा सदाभाऊ खोत यांचा अडसर

राजू शेट्टी यांना पुन्हा सदाभाऊ खोत यांचा अडसर

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर इस्लामपूर येथे मोेर्चा काढला. या मोर्चात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील सहभागी होते. त्यामुळे लोकसभेला हातकणंगले मतदारसंघात शेट्टी भाजपच्या पाठिंब्यावर उमेदवार असतील, असे बोलले जात आहे. मात्र शेट्टी यांना पुन्हा आ. सदाभाऊ खोत यांचाच अडसर असेल. कारण खोत सध्या भाजपसोबत आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. साखर सम्राटांशी जवळीक ऊस उत्पादकांना रुचली नाही. शेट्टी आता पूरग्रस्तांचा प्रश्न हाती घेऊन महाआघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. इस्लामपूर येथील मोर्चात त्यांनी भाजपमधील काही गटांना सहभागी करून घेतले. मोर्चाला कमी प्रतिसाद पाहून रयत क्रांती संघटनेच्या आ. खोत यांच्यासह शेट्टी यांच्या विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आता आगामी काळात शेट्टींनी भाजपचा पाठिंबा घेतला, तर त्यांचे एकेकाळचे सहकारी पण सध्याचे विरोधक आ. सदाभाऊ खोत यांचाच अडसर असणार आहे.

कोट

त्यांनी भाजपचा पाठिंबा काढला, त्यावेळी आत्मक्लेष यात्रा काढली. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये ते सामील असल्याने जनतेचा आणि शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी अगोदर महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. भाजपचा पाठिंबा पाहिजे असेल, तर पवित्र होण्यासाठी आता त्यांनी काशी यात्रा करावी!

- सदाभाऊ खोत, आमदार,

कोट

सध्या मी महाआघाडीतच आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणे, पूरग्रस्तांना न्याय देणे, यासाठीच लढा उभा केला आहे. या प्रश्नांची जाण माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि निशिकांत पाटील यांना असल्याने त्यांना सहभागी करून घेतले होते. यात भाजपचा काहीही संबंध नाही. आगामी राजकारणाची दिशा ठरलेली नाही.

राजू शेट्टी, माजी खासदार,

Web Title: Sadabhau Khot's obstacle to Raju Shetty again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.