पेपरफुटी रॅकेटकडून ४२ लाखांचा डल्ला
By Admin | Updated: December 17, 2015 01:25 IST2015-12-17T00:03:52+5:302015-12-17T01:25:23+5:30
सहा विद्यार्थी अडकले : तपास अंतिम टप्प्यात; लवकरच अटक सत्र सुरू होणार

पेपरफुटी रॅकेटकडून ४२ लाखांचा डल्ला
सांगली : जिल्हा परिषद आरोग्य सेविका पेपरफुटी प्रकरणात आठ ते दहाजणांचे रॅकेट उघडकीस आले आहे. या रॅकेटने पेपर फोडण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून सात ते साडेसात लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात पुढे आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून अटकसत्र सुरू होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
जिल्हा परिषद आरोग्य सेविका परीक्षेतील पेपरफुटीने शासकीय यंत्रणा हादरली आहे. यामागे आठ ते दहा जणांचे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सावजाचा शोध घेतला आहे. त्यांच्या जाळ्यात सध्या सहा विद्यार्थी अडकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी सात ते साडेसात लाख रुपये रॅकेटने घेतले. त्याबाबतचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेली माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेकडून सावध पावले उचलली जात आहेत.
जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही तांत्रिक बाबींची माहितीही पोलिसांनी मागविली आहे. पण त्याबाबत त्यांनी गोपनीयता बाळगली आहे. ही माहिती प्राप्त होताच रॅकेटचा पर्दाफाश केला जाईल, असे उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
पेपर छापल्यापासून ते विद्यार्थ्यांच्या हाती पडेपर्यंतच्या साखळीचा शोध घेतला जात आहे. पेपर कुठे बाहेर पडला, त्याचे वितरण कसे झाले, विद्यार्थ्यांशी संपर्क कसा साधला गेला, याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या रॅकेटमध्ये जिल्हा परिषदेकडील कर्मचारी असून, त्याबाबची अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. येत्या दोन दिवसांत टोळीचे अटकसत्र सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या तरी तपासात कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आलेले नाही. पण पुढील तपासात ज्या कोणाचा पेपरफुटीशी संबंध येईल, त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. या प्रकरणातून कोणाचीही सुटका होणार नाही, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. येत्या एक-दोन दिवसात या प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश होणार आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पेपर फुटीचे प्रकरण कोणा-कोणाला शेकणार, याची चर्चा रंगली आहे. (प्रतिनिधी)