‘वन-वे’मधून जाणारी एस. टी. बस थेट पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:56+5:302021-09-14T04:31:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एकेरी मार्गाचा नियम मोडून मार्गक्रमण करणाऱ्या एस.टी. बसवर वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली. गणेशाेत्सवामुळे ...

‘वन-वे’मधून जाणारी एस. टी. बस थेट पोलीस ठाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एकेरी मार्गाचा नियम मोडून मार्गक्रमण करणाऱ्या एस.टी. बसवर वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली. गणेशाेत्सवामुळे अगोदरच बाजारपेठेतील सर्व रस्ते गर्दीने फुल्ल असताना त्याकडे दुर्लक्ष करत एस.टी. घेऊन वाहतुकीची अधिकच कोंडी करणाऱ्या चालकांना यामुळे चाप बसणार आहे. वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी ही कारवाई करत एस.टी. बस थेट वाहतूक शाखेत आणून लावली.
शहर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेली महापालिकेच्या जुनी इमारत पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे इस्लामपूर, पुण्याला जाणाऱ्या एस. टी. बसेसना महापालिका चाैक, राजवाडा चौक-पटेल चौक-वखारभाग-जुना बुधगाव रोडमार्गे वाहतूक करण्याबाबत सांगण्यात आले आहे. सांगली वाहतूक शाखेच्यावतीने वाहतूक नियंत्रकांना याबाबत कळविण्यात आले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक बसेस नवसंदेश बोळ-मैत्रीण कॉर्नरमार्गे तर काही पटेल चौकातून गणपती पेठ रस्त्यावरून एकेरी मार्ग असतानाही जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास सहायक निरीक्षक देशमुख वाहतूक नियोजनासाठी असताना, कवठेमहांकाळ-दापोली ही बस पटेल चौकातून गणपती पेठमार्गे जाताना आढळून आल्याने पोलिसांनी त्या बसवर एकेरी मार्गाचा भंग केल्याबाबत कारवाई केली व बस वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणून लावण्यात आली.
चौकट
वाहतूक नियोजनासाठी सहकार्य करा
सध्या गणेशोत्सवामुळे शहरात गर्दी आहे. त्यामुळे एस.टी. बसचालकांसह इतर अवजड वाहनचालकांनी एकेरी मार्गाचा अवलंब करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी दिला.