कुलकर्र्णींची जामिनासाठी धाव
By Admin | Updated: November 22, 2014 00:00 IST2014-11-21T23:15:48+5:302014-11-22T00:00:47+5:30
सोमवारी सुनावणी : इस्लामपुरातील गर्भसमाप्ती प्रकरण

कुलकर्र्णींची जामिनासाठी धाव
इस्लामपूर : शहरातील वारणा हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेत वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना गर्भसमाप्ती केल्याप्रकरणी डॉ. राम कुलकर्णी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, डॉ. कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी आज (शुक्रवारी) येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या अंतरिम व मूळ अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या आदेशावरुन शासनाच्या विविध विभागांनी डॉ. कुलकर्णी यांच्याकडे चौकशी केली आहे. पहिल्यांदा तहसीलदार रूपाली सरनोबत आणि प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान व चाचणी कायद्यान्वये गठित असलेल्या समितीच्या विधी सल्लागार अर्चना उबाळे यांच्या पथकाने छापा मारून काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यांची छाननी अद्याप सुरू आहे.
त्यानंतर दुसऱ्यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा मारुन तेथील औषधसाठा, काही आक्षेपार्ह औषधे ताब्यात घेताना, रुग्णालयामधील औषध दुकानाचा गैरकारभार उजेडात आणला. नोंदणीकृत औषध निर्माणशास्त्र पदविका धारकाशिवाय औषधविक्री होत असल्याचे उघड झाले होते. त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे.
काल या चौकशीमध्ये डॉ. कुलकर्णी यांच्या रुग्णालयामध्ये गर्भपात करण्याच्या प्रक्रियेत बरीच अनियमितता आढळून आली. तसेच वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी मुंबई नर्सिंग होम कायद्याखाली परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र डॉ. कुलकर्णी यांनी हा परवाना न घेताच दुसऱ्या शाखेत गर्भसमाप्तीचे काम करुन त्या कायद्याचा भंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यावर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी तेथील शस्त्रक्रिया विभागाला सील ठोकून डॉ. कुलकर्णी यांच्याविरुध्द पोलिसांत फिर्याद दिली. अजून प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान व चाचणी कायदा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर स्वतंत्र कारवाईचे संकेत डॉ. सांगळे यांनी दिले.
डॉ. कुलकर्णी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानासह रुग्णालयामध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र डॉ. कुलकर्णी यांचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, पोलिसांना गुंगारा देत असलेल्या डॉ. कुलकर्णी यांनी आज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश रा. ना. सरदेसाई यांच्यासमोर अंतरिम व मूळ अटकपूर्व जामिनाचे दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. (वार्ताहर)
गर्भपात प्रक्रियेत अनियमितता
कुलकर्णी यांच्या रुग्णालयामध्ये गर्भपात करण्याच्या प्रक्रियेत बरीच अनियमितता आढळून आली. तसेच वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परवाना न घेताच दुसऱ्या शाखेत गर्भसमाप्तीचे काम करुन त्या कायद्याचा भंग केल्याचेही चौकशीत उघडकीस आल्याने शस्त्रक्रिया विभाग सील करण्यात आला आहे.