सांगलीत पाण्यासाठी धावाधाव
By Admin | Updated: June 12, 2016 00:57 IST2016-06-12T00:57:23+5:302016-06-12T00:57:23+5:30
टँकरने पुरवठा : आजपासून यंत्रणा सुरळीत; वीज पुरवठा खंडितचा परिणाम

सांगलीत पाण्यासाठी धावाधाव
सांगली : नुकत्याच झालेल्या वादळी वारे व मुसळधार पावसामुळे शहरातील झाडे, विद्युत खांब उन्मळून पडले होते. त्यामुळे सांगली शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी सायंकाळी वीज पुरवठा सुरू करून पाणी पुरवठा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. शनिवारी दुसऱ्या दिवशीही अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरात पाणी पुरवठा बंद होता. महापालिकेने टँकरद्वारे काही भागात पाणीपुरवठा केला.
गुरूवारी झालेल्या पावसामुळे शहरात ३५ झाडे पडली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलजवळील पाच विद्युत खांब मोडून पडले होते. परिणामी एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गुरूवारी रात्रीपासूनच जॅकवेलचा पाणी उपसा बंद झाला. शुक्रवारी दिवसभर शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव झाली होती. सकाळपासूनच महापालिका व वीज वितरण कंपनीने विद्युत तारांवर पडलेली झाडे बाजूला करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाचच्या दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे वीज कनेक्शन जोडण्यात आले. त्यानंतर पालिकेने पाणी उपसा सुरू केला.
पण शुक्रवारी दिवसभर पाण्याची टाकी व जलवाहिन्या रिकाम्या झाल्याने त्या भरण्यात वेळ गेला. त्याचा परिणाम शनिवारी पाणी पुरवठ्यावर झाला. यशवंतनगर, संजयनगर, शंभरफुटी रस्ता, लक्ष्मी देऊळ, अभयनगर, विजयनगर, शामरावनगर, हनुमाननगर, त्रिमूर्ती कॉलनी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. गव्हर्न्मेंट कॉलनी व काही भागात पाणी पुरवठा खंडित होता. पालिकेने चार ते पाच टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला. शनिवारी दिवसभर पाणी उपसा केल्याने रविवारी सांगलीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले.
वॉटर एटीएमला गर्दी
सांगलीत दोन दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांनी महापालिकेच्या शास्त्री चौकातील वॉटर एटीएमवर पाण्यासाठी गर्दी केली होती. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या या वॉटर एटीएमवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. एक रुपयात दहा लिटर पाणी मिळत असल्याने नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. (प्रतिनिधी)