सोशल मीडियावर विटंबनेच्या अफवेने बुधगावात तणाव
By Admin | Updated: February 7, 2015 00:12 IST2015-02-06T23:09:55+5:302015-02-07T00:12:57+5:30
सांगली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी छायाचित्र पाहिले असता ते अरेबियन योद्ध्याचे असल्याचे निष्पन्न झाले

सोशल मीडियावर विटंबनेच्या अफवेने बुधगावात तणाव
सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने राष्ट्रपुरुषाची विटंबना होईल असे छायाचित्र सोशल मीडियावरून प्रसारित केल्याची अफवा पसरल्याने महाविद्यालयात प्रचंड तणाव निर्माण झाला. यावेळी छायाचित्र प्रसारित करणाऱ्यास पकडून बेदम चोप दिला. गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ही घटना घडली. सांगली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी छायाचित्र पाहिले असता ते अरेबियन योद्ध्याचे असल्याचे निष्पन्न झाले. महाविद्यालयात चार हजारांवर विद्यार्थी आहेत. व्हॉटस् अॅपवरील ‘टपोरी अड्डा’ नावाच्या ग्रुपमधील एकाने घोड्यावर स्वार झालेले छायाचित्र प्रसारित केले होते. काही विद्यार्थ्यांनी छायाचित्र राष्ट्रपुरुषाचे असून, त्याची विटंबना केल्याची चर्चा सुरू केली. छायाचित्र पाहिले तर ते कोणाचे हेही समजत होते, तरीही विद्यार्थ्यांचा गट मोठ्या संख्येने जमा झाला. त्यांनी छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या ग्रुपच्या विद्यार्थ्यास शोधून बेदम चोप दिला.