राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा
By Admin | Updated: November 23, 2014 23:52 IST2014-11-23T23:16:32+5:302014-11-23T23:52:22+5:30
हातगाडी असोसिएशन : टप्प्या-टप्प्याने आंदोलन उभारणार

राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा
सांगली : महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्णय सांगली, मिरज आणि कुपवाड शहर फेरीवाला संघर्ष कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे जिल्हा निमंत्रक सुरेश टेंगले होते.
सांगली शहर (फास्ट फूड) विक्रेता हातगाडी असोसिएशनच्यावतीने फेरीवाला न्याय्य हक्कासाठी व राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता सर्वपक्षीय फेरीवाला संघटनांची बैठक आज (रविवार) येथील विश्रामगृहात झाली. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर फेरीवाला संघर्ष कृती समितीची स्थापना करण्यात आली. विविध मागण्यांसाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
महापालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, ज्या इतिहासकालीन भाजी मंडई आहेत, त्या अद्ययावत करण्यात याव्यात, फेरीवाल्यांवर सुरु असलेल्या महापालिकेच्या व पोलिसांच्या कारवाया थांबविण्यात याव्यात, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना त्यांच्या जागा आखून देऊन परावाना देण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मागण्यांसाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलन उभारण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीला दयानंद धुमाळ, विशाल पवार, प्रसाद रिसवडे, सिंधू शिंदे, महादेव शिंदे, दाऊदभाई तहसीलदार, रवींद्र घोडके, राजू काटकर, अशोक कोळी, संतोष माणगावकर, विनायक शिंदे, दिनेश नागणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बुधवारी घंटानाद आंदोलन करणार
हातगाडी असोसिएशनच्या विविध मागण्यांसाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येणार असून, याचा पहिला टप्पा म्हणून घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी सांगलीतील मित्रमंडळ चौकातील एचसीएल कार्यालयासमोर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी फेरीवाल्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले.