‘आरटीओे’ने जमविले ८८ कोटी
By Admin | Updated: March 29, 2016 00:26 IST2016-03-28T23:46:20+5:302016-03-29T00:26:51+5:30
दशरथ वाघुले : ओव्हरलोड, रिक्षांसह वडापवर कारवाई

‘आरटीओे’ने जमविले ८८ कोटी
सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे २०१५-१६ या वर्षाचे महसुलाचे उद्दिष्ट क्षमता ओलांडून गेले आहे. शासनाने ७९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. पण ते ८८ कोटींवर गेले आहे, अशी माहिती आरटीओ दशरथ वाघुले यांनी दिली. ओव्हरलोड मालाची वाहतूक, रिक्षांसह अवैध प्रवासी वाहतुकीसह विविध कर वसुलीतून हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, असेही वाघुले यांनी सांगितले.
ते म्हणाले, कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमकरता आहे. तरीही कारवाईमध्ये सातत्य ठेवले होते. दहा मोटार वाहन निरीक्षकांच्या जोरावर उद्दिष्ट पूर्ण करुन त्यामध्ये ११ टक्क्यांची वाढ केली आहे. ओव्हरलोड मालाच्या वाहतुकीविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम उघडली होती. यामध्ये एक हजार ११८ वाहने सापडली. त्यांच्याकडून दीड कोटीचा दंड वसूल केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात हजार वाहनधारकांना पकडून दोन कोटी ५५ लाखांचा दंड जमा करुन घेतला. अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्धही वर्षभर कारवाई सुरु राहिली. साडेतीन हजार वाहनांची तपासणी केली. यात सातशे वाहने दोषी आढळली. यातून ६५ लाखांचा दंड वसूल झाला. नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या सातशे रिक्षांवर कारवाई झाली. त्यांच्याकडूृन १५ लाखांचा दंड वसूल केला.
ते म्हणाले, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शंभर वाहनांची नोंदणी सहा महिन्यांसाठी निलंबित केली. सव्वादोनशे वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले होते. स्कूल बसचीही सातत्याने तपासणी सुरु राहिली. यामध्ये १२३ बसेस दोषी आढळल्या. एक लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. रिफ्लेक्टर नसलेली तीन हजार वाहने सापडली. यातून एक लाख ३६ हजाराचा दंड वसूल झाला. कर्णकर्कश हॉर्न लावणारी १२३ वाहने सापडली. त्यांचे हॉर्न काढून टाकण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल केला. यासह विविध कारवाईतून ८८ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. (प्रतिनिधी)
सांगली अव्वल : साडेआठ कोटींची वाढ
शासनाने ७९ कोटी ४१ लाखांचे महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. पण आरटीओ कार्यालयाने हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याबरोबर त्यामध्ये साडेआठ कोटींची वाढ केली. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीच्या आरटीओ कार्यालयाने महसूल उद्दिष्टामध्ये बाजी मारली आहे.