हॉस्पिटलच्या क्रेडिट सोसायटीत साडेसात लाखांचा गैरव्यवहार
By Admin | Updated: December 22, 2016 00:02 IST2016-12-22T00:02:04+5:302016-12-22T00:02:04+5:30
अध्यक्ष, सचिवाला अटक : वानलेसवाडी येथील संस्था

हॉस्पिटलच्या क्रेडिट सोसायटीत साडेसात लाखांचा गैरव्यवहार
सांगली : येथील वानलेसवाडीमधील चेस्ट हॉस्पिटल एम्प्लॉईज को- आॅप. क्रेडिट सोसायटीमध्ये एप्रिल २०१३ ते २४ जून २०१५ या कालावधित साडेसात लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष राजू अजय्या मसशन आणि सचिव जेम्स इमॅन्युअल विल्यम (दोघेही रा. वानलेसवाडी) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना २६ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या गैरव्यवहारप्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी बाळासाहेब परशराम दार्इंगडे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती. वानलेसवाडी येथे चेस्ट हॉस्पिटल एम्प्लॉईज को-आॅप. क्रेडिट सोसायटी आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी कार्यरत आहे.
या सोसायटीच्या अध्यक्षपदी राजू मसशन व सचिव जेम्स विल्यम काम पाहत होते. या दोघांना सोसायटीचे आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार होते. १ एप्रिल २०१३ ते २४ जून २०१६ या कालावधीतील सोसायटीचे लेखापरीक्षण करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी नियुक्त केलेले लेखापरीक्षक सोसायटीत गेले असता, या दोघांनी संगनमताने सोसायटीची कागदपत्रे व दफ्तर देण्यास टाळाटाळ केली.
लेखापरीक्षकांनी वारंवार दफ्तर व कागदपत्रांची मागणी केली; पण अखेरपर्यंत त्यांनी लेखापरीक्षकांना कागदपत्रे सादर केली नाही. लेखापरीक्षकांनी याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सोसायटीची चौकशी केली. या चौकशीवेळीही या दोघांना अनेकवेळा सूचना देऊनही त्यांनी दफ्तर व कागदपत्रे दिली नाहीत. त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अध्यक्ष अजय्या व सचिव विल्यम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार धर्मादाय कार्यालयाकडील बाळासाहेब दार्इंगडे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात, सोसायटीचे अध्यक्ष अजय्या व सचिव विल्यम या दोघांनी साडेसात लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची फिर्याद दिली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी दोघांना बुधवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास निरीक्षक मोरे करीत आहेत. सोसायटीमधील भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाने सोसायटीच्या सभासदांमध्ये खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)
फसवणुकीचा गुन्हा
चेस्ट हॉस्पिटल एम्प्लॉईज सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी संगनमताने सोसायटीतील गैरव्यवहार लपविण्याच्या उद्देशाने कागदपत्रे व दफ्तर गहाळ झाल्याचे सांगून, लेखापरीक्षकांना ती देण्यास टाळाटाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दाखल झालेल्या या तक्रारीनुसार आता पोलिसांमार्फत पुढील तपास केला जाणार आहे.