आष्टा शहरात व्यायामशाळा इमारत, साहित्य व ट्रॅक्टरसाठी ३५ लाख रुपये मंजूर : वीर कुदळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:15+5:302021-05-08T04:26:15+5:30
आष्टा : शहरात व्यायामशाळा इमारत बांधकाम व आधुनिक व्यायामसाहित्यासाठी २५ लाख रुपये व ट्रॅक्टरसहित जंतुनाशक औषध फवारणी यंत्रसामग्री खरेदीसाठी ...

आष्टा शहरात व्यायामशाळा इमारत, साहित्य व ट्रॅक्टरसाठी ३५ लाख रुपये मंजूर : वीर कुदळे
आष्टा : शहरात व्यायामशाळा इमारत बांधकाम व आधुनिक व्यायामसाहित्यासाठी २५ लाख रुपये व ट्रॅक्टरसहित जंतुनाशक औषध फवारणी यंत्रसामग्री खरेदीसाठी १० लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपयांचा निधी खासदार धैर्यशील माने यांनी मंजूर केला असल्याची माहिती पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी दिली.
वीर कुदळे म्हणाले, खासदार धैर्यशील माने यांना भेटून आष्टा येथे अद्ययावत व्यायामशाळा इमारत व आधुनिक व्यायामसाहित्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी केली होती तसेच आष्टा पालिकेसाठी ५० अश्वशक्तीचा १ ट्रॅक्टर-ट्रॉली व २ हजार लिटर क्षमतेचे जंतुनाशक फवारणी यंत्र मिळण्याबाबत मागणी केली होती. या दोन्ही मागण्या मान्य झाल्या असून, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ३ मे रोजी वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत शासन अध्यादेश काढला आहे.
आष्टा शहरात सार्वजनिक अशी पालिकेच्या मालकीची व्यायामशाळा नाही. शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या ठिकाणी शंभर वर्षांपूर्वीची मोडकळीस आलेली तालीम आहे. या ठिकाणी अनेक तरुण व्यायाम करतात, मात्र तालमीची इमारत धोकादायक आहे. त्या ठिकाणी व्यायामशाळा इमारत व आधुनिक व्यायामसाहित्यासाठी २५ लाख रुपये खासदार धैर्यशील माने यांनी मंजूर केले आहेत.
शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एकाच जंतुनाशक फवारणी ट्रॅक्टरमुळे कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. १० लाखांच्या निधीमुळे ही गैरसोय दूर होणार आहे. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी व्यायामशाळेच्या बांधकामासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करून तसेच जंतुनाशक फवारणी ट्रॅक्टरसाठी प्रशासकीय मान्यता द्यावी, नगराध्यक्ष स्नेहा माळी यांनी तत्काळ पालिकेची विशेष सभा आयोजित करावी, अशी मागणी वीर कुदळे यांनी केली आहे.