राष्ट्रीय पेयजल योजनेत पस्तीस कोटीचा घोटाळा
By Admin | Updated: September 28, 2015 23:51 IST2015-09-28T23:17:07+5:302015-09-28T23:51:13+5:30
गौतम पवार : गाडगीळांनी चौकशी लावावीच

राष्ट्रीय पेयजल योजनेत पस्तीस कोटीचा घोटाळा
सांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या निधीतून महापालिका हद्दीत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली असून जुन्या लोखंडी व बिडाच्या पाईपची ठेकेदार व अधिकाऱ्यांनी परस्परच विल्हेवाट लावली आहे. यात सुमारे ३० ते ३५ कोटीचा घोटाळा झाला असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी या प्रकरणाचीही चौकशी लावावी, असे आव्हान शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिले. या कामाचा ठेका भाजप पदाधिकाऱ्याच्या बगलबच्च्यांनी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
पवार म्हणाले की, पेयजल योजनेतून वारणा उद्भव व सुजल निर्मलअंतर्गत महापालिकेला १२५ कोटीचा निधी मिळाला होता. या निधीतून विविध कामे करण्यात आली. तत्कालीन उपमहापौर व भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या बगलबच्च्यांनी पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतला होता. त्यात नवीन वाहिन्या टाकताना जुन्या वाहिन्या काढण्यात आला. त्यातील लोखंडी व बिडाच्या पाईपची ठेकेदाराने परस्पर विल्हेवाट लावली आहे. त्यातून महापालिकेला ३० ते ३५ कोटीचा फटका बसला आहे. यात अधिकारीही सामील आहेत. पदाधिकाऱ्याला जाब विचारला होता. तसेच माजी आ. संभाजी पवार यांनी विधिमंडळातही चौकशीची मागणी केली होती. भानगडीमुळेच त्यांचा राजीनामा घेतल्याचेही ते म्हणाले. आमदार, खासदारांनी महापालिकेच्या कारभाराबाबत डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आरोप आम्ही केला, तेव्हा आमदार सुधीर गाडगीळ यांना जाग आली. त्यांनी २००८ ते २०१५ या कालावधीतील कामकाजाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांना महापालिकेत पाचशे कोटीचा घोटाळा दिसला. या लेखापरीक्षणात भाजप पदाधिकाऱ्याच्या घोटाळ्याचीही चौकशी होणार का? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)