चोवीस योजनांमध्ये १.३६ कोटींचा घोटाळा
By Admin | Updated: April 10, 2015 23:35 IST2015-04-10T23:32:04+5:302015-04-10T23:35:18+5:30
ठेकेदारांमध्ये खळबळ : पाणीपुरवठा समिती अध्यक्षांसह ५६ जणांच्या मालमत्तेवर बोजा चढविणार

चोवीस योजनांमध्ये १.३६ कोटींचा घोटाळा
सांगली : जत तालुक्यातील २४ गावांमधील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव आणि तांत्रिक सेवा पुरवठादार अशा ५६ जणांवर एक कोटी ३६ लाखांच्या निधीची जबाबदारी निश्चित केली आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांनी पाणी योजनांची कामे पूर्ण केली नाहीत. शिल्लक निधीही जिल्हा परिषदेकडे भरला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून शासकीय रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केला आहे. या प्रस्तावावर काय निर्णय घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.पाणी योजनांच्या प्रश्नांवर विधानसभेत ‘लक्षवेधी’ मांडण्यात आली होती. जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दक्षता समितीच्या सभेतही पाणी योजनांमधील घोटाळ्यावरून आमदार, खासदारांनी प्रशासनाचे वाभाडे काढले होते. खा. संजयकाका पाटील यांनी पाणी योजनांमध्ये घोटाळा करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी घोटाळेखोरांची यादी देण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार जत तालुक्यातील २४ गावांमधील अपूर्ण योजना आणि घोटाळ्यांचा अहवाल तयार करण्यात आला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २४ गावांमध्ये ३ कोटी ९० लाखांचा घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच, ठेकेदारांना नोटिसा बजावल्यानंतर त्यातील दोन कोटी ५४ लाखांचा निधी वसूल झाला होता. उर्वरित एक कोटी ३६ लाखांचा निधी वसूल होत नसल्याने २४ गावांमधील समिती अध्यक्ष, सचिव, ठेकेदार, तांत्रिक सेवा पुरवठादार आदी ५६ व्यक्तींवर जबाबदारी निश्चित केली आहे.
त्यांच्याकडून ही रक्कम वसूल होत नसल्याने त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. (प्रतिनिधी)
पाणी योजनांच्या घोटाळ्यातील गावे
लमाणतांडा (उटगी), सोनलगी, सुसलाद, खिलारवाडी, गुगवाड, वायफळ, घोलेश्वर, निगडी खुर्द, जिरग्याळ, साळमळगेवाडी, वळसंग, लमाणतांडा (दरीबडची), जालिहाळ, गिरगाव, पांढरेवाडी, आवंढी, कंठी, भिवर्गी, धुळकरवाडी, गोंधळेवाडी, हळ्ळी, करेवाडी (तिकोंडी), खंडनाळ, लकडेवाडी.
घोटाळ्याची यांच्यावर जबाबदारी निश्चित
भीमराव चव्हाण, कमलाबाई लमाण, मधुकर लमाण- प्रत्येकी ४.७२ लाख, सुरेश पवार- १.५९ लाख, तुकाराम ढिगाले, आक्काताई कुलाळ, संजय कोळे प्रत्येकी ६२ हजार ८१२ रूपये, आप्पासाहेब पांढरे ९८ हजार, राणी ईरकर चार लाख तीन हजार, छायाताई राणगट्टे, तायाप्पा टोणे प्रत्येकी एक लाख ९७ हजार, गजानन भुसनर, गोपीनाथ चव्हाण, उषा लकडे, विलास भुसनर प्रत्येकी एक लाख ५७ हजार, तुकाराम करे, शोभा आमुतट्टी, बाबू काळे, सातू खरात प्रत्येकी एक लाख ५७ हजार, शंकर चव्हाण, ज्योती माने, शंकराप्पा मदने प्रत्येकी एक लाख ३५ हजार, आप्पासाहेब पाटील, म्हाळाप्पा पुजारी प्रत्येकी पाच लाख २९ हजार, विमल माने, अण्णाप्पा खांडेकर प्रत्येकी २७ हजार ९६३ रूपये, बाबूराव कोडग, रघुनाथ पाटील प्रत्येकी तीन हजार ८३ हजार, आप्पासाहेब पाटील, नंदकुमार कंटीकर, सदाशिव शेळके प्रत्येकी दोन लाख १८ हजार, सगोंडा कोकणी ८६ हजार, विद्या कोडग, गणपत कोडग प्रत्येकी सहा लाख दोन हजार, आप्पासाहेब नाईक, मुनेलावेगम नाईक, खंडू तांबे प्रत्येकी एक लाख २५ हजार, अशोक यादव, बापूसाहेब यादव, उर्मिला पाटील प्रत्येकी दोन लाख ८९ हजार, बसवराज खबेकर, महादेवी पाटील प्रत्येकी एक लाख ९४ हजार, सुमित्रा कुंभार, कल्लाप्पा बिराजदार प्रत्येकी एक लाख ३५ हजार, नागराज भोसले ८१ हजार, गोविंद शेजूर दोन लाख ९४ हजार, तांत्रिक सेवा पुरवठादार डी. वाय. चव्हाण दहा लाख ९८ हजार, के. डी. मुल्ला दहा लाख, अशी जबाबदारी निश्चित केली आहे.