मृत मित्राच्या कुटुंबासाठी २४ तासांत सव्वापाच लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:33+5:302021-05-14T04:26:33+5:30
सांगली : कोरोनाने अख्ख्या कुुटुंबाला ग्रासले. कर्त्या पुरुषाला हिरावून नेले. आधारस्तंभच मोडून पडला. अशावेळी जिवाभावाच्या दोस्तांनी अवघ्या २४ तासांत ...

मृत मित्राच्या कुटुंबासाठी २४ तासांत सव्वापाच लाख रुपये
सांगली : कोरोनाने अख्ख्या कुुटुंबाला ग्रासले. कर्त्या पुरुषाला हिरावून नेले. आधारस्तंभच मोडून पडला. अशावेळी जिवाभावाच्या दोस्तांनी अवघ्या २४ तासांत तब्बल सव्वापाच लाख रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली. या कुटुंबाला पुन्हा सावरण्याचा आत्मविश्वास मिळवून दिला.
कोरोनाने माणसे नेली तरी माणुसकीला तो हरवू शकला नाही हे सांगणारा हा अनुभव. राहुरी (जि. अहमदनगर) येथील रोहिदास गागरे यांच्यामागे देवाप्रमाणे उभ्या राहिलेल्या दोस्तांची गोष्ट. ‘के ८४’ म्हणजे कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयाची १९८४-८५ ची बॅच. शिक्षणानंतर सारे वेगवेगळ्या क्षेत्रात पांगले. अनेक चांगल्या पदांवर गेले. काहीजण कर्नाटक, आंध्रसह विविध राज्यांत गेले, तर अनेकजण उद्योग, व्यवसाय, शेतीत रमले. काहीजण अमेरिकेतही रुजले. परस्परांपासून दूर राहूनही मानसिक एकजूट मात्र कायम आहे.
गेल्या आठवड्यात ग्रुपमधील राहुरीच्या रोहिदास गागरेच्या निधनाचे वृत्त आले. त्याचे कुटुंबदेखील रुग्णालयात कोरोनाशी झुंजत होते. कर्ता पुरुषच गेल्याने सारेच खचले होते. के-८४ ग्रुपही अस्वस्थ होता. रोहिदास म्हणजे ग्रुपचा खंदा कार्यकर्ता होता. साखर कारखान्यात नोकरी करताना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असायचा. त्याच्या पश्चात कुटुंबाची आबाळ होऊ नये ही सर्वांचीच प्रामाणिक तळमळ. त्यातूनच निधी संकलनाचे बीज पेरले गेले. एका वाक्याच्या आव्हानासरशी रोहिदासच्या बँक खात्यात मदतीचा प्रवाह सुरू झाला. १ हजारापासून २० हजारांपर्यंत रक्कम जमा होत गेली. २४ तासांत ५ लाख २२ हजार २२७ रुपये गोळा झाले.
रोहिदास यांच्या कुटुंबासाठी ही मदत अनपेक्षित होती. हे पैसे आता त्यांच्या मुलांच्या नावे बँकेत ठेवले जातील. त्यातून शिक्षण व संगोपन केले जाईल.
चौकट
कोल्हापूूर कृषी महाविद्यालय ८४
के-८४ ग्रुपच्या सदस्यांत वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यापासून किराणा व्यावसायिकापर्यंत अनेकांचा समावेश आहे. विद्यार्थिदशेतील मानसिक गुंफण ग्रुपने सांभाळले आहे. सांगलीतील सुमारे बारा-तेराजण, तर कोल्हापुरातील पंधराजण ग्रुपमध्ये आहेत. शिवाय सातारा, पुणे, सोलापूर येथेही अनेकजण राहतात. अमेरिकेत राहणाऱ्या राम मोहन यांनी ५५० डॉलर (४० हजार ६२७ रुपये) पाठविले.