‘रोहिणी’चा पेरा अन् मोत्याचा तुरा..!
By Admin | Updated: June 1, 2015 00:20 IST2015-05-31T23:22:22+5:302015-06-01T00:20:05+5:30
शिराळा तालुक्यातील स्थिती : खरिपाच्या पेरणीसाठी मशागती जोमाने सुरू

‘रोहिणी’चा पेरा अन् मोत्याचा तुरा..!
विकास शहा - शिराळा -‘रोहिणी’चा पेरा अन् मोत्याचा तुरा’ अशी बळीराजाची म्हण आहे. वळिवाच्या पावसानंतर मशागती पूर्ण होऊन रोहिणी नक्षत्रात पावसाळी पेरणी व्हावी, अशी बळीराजाची अपेक्षा असते. सध्या शिराळा तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतात मशागतीची कामे गतीने सुरू आहेत. तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागामध्ये धूळवाफेवरील भात पेरणीलाही गती आली आहे. १९ मेपासून पेरण्या सुरू झाल्या आहेत. संपूर्ण शिवार गर्दीने फुलून गेले आहे.
तालुक्यात काही ठिकाणी वळीव पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी जोराचा वळीव पाऊस पडलेला नाही. जेथे हा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे, तेथे मशागतीच्या कामाला जोर दिसून येत आहे. अलीकडच्या काळात बैलजोडीचे प्रमाण कमी झाल्याने छोट्या—मोठ्या ट्रॅक्टरने शेतात मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टरने मशागत करून हाताने कुरी ओढून भात पिकाची पेरणी केली जात आहे.
मे महिना संपला तरी उन्हाचा तडाखा वाढतच आहे. त्यामुळे सकाळी ६ ते १२ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शेतात शेतकरी काम करताना दिसत आहेत. उसाच्या लागणी, खोडवी फोडणे, शेतात बांध घालणे, तालुक्यात भात पिकाचे प्रमाण मोठे असल्याने जमिनीच्या लांबी, रुंदीवर पावसाचे पाणी साठून राहण्यासाठी बांध घातले जात आहेत. त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहते. त्याचबरोबर उगवणीनंतर मशागतीला अडथळा येऊ नये म्हणून गतवेळच्या पिकाचे सड, घाण वेचणे ही कामेही गतीने सुरू आहेत.
शिराळा तालुक्यात खरीप पेरणीची तयारी पश्चिम व उत्तर भागात अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र पूर्व भागात अजूनही पेरणीपूर्व मशागतीला म्हणावा असा वेग आलेला नाही. गुढे, पाचगणी, त्याचबरोबर मेणी खोरा, उत्तर भागातील वाकुर्डे, शिरशी, धामवडे आदी परिसरामध्ये धूळवाफेवरील पेरणी गतीने सुरु असून काही दिवसात भात पेरणीची कामे पूर्ण होतील.
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३ हजार ४१७ हेक्टर असून त्यापैकी पिकाखालील क्षेत्र ३७ हजार ८५२ हेक्टर आहे. त्यापैकी यावर्षी सुमारे २९ हजार १३0 हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगामासाठी चालूवर्षी सोयाबीन बियाणाचा काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. मात्र तालुका कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरासाठी प्रात्यक्षिक सुरु केले आहे. त्यामुळे घरगुती बियाणांचा चालूवर्षी मोठा वापर होणार आहे. खरिपाच्या हंगामासाठी खतांचा मात्र मुबलक साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे.
मजुरांचा तुटवडा
तालुक्यात एकाचवेळी सर्वत्र खरिपाच्या हंगामाचे वेध सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. ज्यादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर बैलजोड्यांचे प्रमाण कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना चालूवर्षी चांगलाच बसत आहे.
यंदा ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्र
शिराळा तालुक्यात चालूवर्षी २९ हजार १३0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये भात १३ हजार ६१३ हेक्टर, ज्वारी २ हजार २0५, मका १ हजार २६२, नाचणी ६७, तर तृणधान्ये ६0, भुईमूग ३ हजार १३३, सोयाबीन २ हजार ५00 हेक्टर आदी बियाणांच्या पेरण्या बाकी क्षेत्रामध्ये होणार असल्याची शक्यता आहे.
तालुकास्तरावर बियाणे, खते, कीटकनाशके गुणवत्ता नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. खरिपासाठी सोयाबीन बियाणांची काही प्रमाणात कमतरता भासणार असली तरी, शेतकऱ्यांकडे असणाऱ्या बियाणांची प्रत तपासून त्याबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कृषी खात्यामार्फत सुरु आहे. त्याचबरोबर बियाणे व रासायनिक खतामधील भेसळ रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- भगवानराव माने, शिराळा तालुका कृषी अधिकारी.