सांगली-मिरज मार्गावर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST2021-01-04T04:22:27+5:302021-01-04T04:22:27+5:30
सांगली : सांगली-मिरजेदरम्यान शहर बससेवेला शह देत रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. अवघ्या १० किलोमीटर प्रवासासाठी ३० ते ४० ...

सांगली-मिरज मार्गावर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट
सांगली : सांगली-मिरजेदरम्यान शहर बससेवेला शह देत रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. अवघ्या १० किलोमीटर प्रवासासाठी ३० ते ४० रुपये घेतले जात आहेत. या लूटीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.
गेले सात-आठ महिने रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनी जणू वसुलीच सुरू केली आहे. एरव्ही सांगली ते मिरज प्रवासासाठी वडाप रिक्षाचालक २५ रुपये भाडे घ्यायचे. त्याऐवजी आता ३० ते ४० रुपये घेतले जात आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचे निमित्त पुढे केले जात आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी नसल्याने धंदा परवडत नाही, असेही सांगितले जात आहे.
या मार्गावर शंभर टक्के शहर बस सुुरू झालेल्या नाहीत. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. बससाठी पंचवीस रुपये तिकीट आहे, रिक्षाला मात्र मनमानी सुरू आहे. बस थांब्यावरूनच प्रवासी घेतले जात आहेत.
वास्तविक या मार्गावर टप्पा वाहतूक करण्यास सहाआसनी रिक्षांना परवानगी नाही, तरीही शंभरावर रिक्षा दिवसभर भरधाव धावत असतात. राममंदिरपासून विश्रामबागला जायचे तरी २० रुपये आकारले जातात. सांगली व मिरज बसस्थानकात उतरणाऱ्या परगावच्या प्रवाशांकडून तर यापेक्षा जास्त भाडे वसूल केले जाते.
चौकट
पोलीस, आरटीओचा कानाडोळा
सांगलीत सिटी पोस्ट, विजयनगरमधील न्यायालय परिसरातील अनधिकृत रिक्षाथांबे, प्रवाशांची बेकायदा वाहतूक, मनमानी भाडे आकारणी याकडे वाहतूक पोलीस व आरटीओने कानाडोळा केला आहे. त्यामुळे सहा आसनी रिक्षाचालकांचे फावले आहे. ‘साहेबांना एन्ट्री द्यावी लागते‘ असे सांगत अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते.
---------