लबाडाकडून खोटेच आश्वासन मिळणार !
By Admin | Updated: August 11, 2014 00:17 IST2014-08-10T23:37:53+5:302014-08-11T00:17:12+5:30
संजय पाटील : आटपाडीत गृहमंत्र्यांवर केली टीका

लबाडाकडून खोटेच आश्वासन मिळणार !
आटपाडी : काल (शनिवारी) आटपाडीत येऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी धनगर समाजाला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच न्याय देईल, असे आश्वासन दिले. मात्र धनगर समाजाने आश्वासनाला बळी पडू नये. कारण एका लबाड माणसाने दिलेले हे लबाड आश्वासन आहे, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी येथे केली.
येथील तहसील कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून गोपीचंद पडळकर युवा मंचच्यावतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी येऊन खा. पाटील यांनी कार्यकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
ते म्हणाले की, धनगर समाजाच्या मागण्या रास्त आहेत. आर. आर. पाटील यांच्या आश्वासनाला भुलू नका. खोट्या आश्वासनाने तुम्ही भुलणार नाही, हे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.
यावेळी रासपचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी म्हणाले की, धनगर समाजाने सनदशीर मार्गाने अनुसूचित जमातीत समावेशासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र असंवेदनशील सरकारने याची दखल घेतलेली नाही. आता आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. यावेळी खासदार पाटील यांच्या विनंतीवरून कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
जयवंत सरगर, विनोद गोसावी, मंथन मेटकरी, अनिल म. बाबर, धुळा देवडकर, महादेव मासाळ, मोहन पडळकर, संजय यमगर, आबा मंडले, शिवाजी माने, शिवराम मासाळ, प्रकाश मरगळे उपस्थित होते. (वार्ताहर)