मिरजेत पावसाने रस्त्यांची धूळधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:37+5:302021-08-23T04:29:37+5:30
मिरज : मिरजेत पावसाने शहरातील रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती ...

मिरजेत पावसाने रस्त्यांची धूळधाण
मिरज : मिरजेत पावसाने शहरातील रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती केलेल्या शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांवरील खड्ड्यात मुरूम टाकण्यात येत असल्याने रस्त्यावर चिखल होत आहे. पावसाळा होईपर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
मिरजेतील छत्रपती शिवाजी रोड, वंटमुरे कॉर्नर ते स्टेशन चौक रोड, दर्गा रोड, शनिवार पेठ, वखारभाग, मालगाव रोड, टाकळी रोड यासह सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाने शहरातील सर्व रस्ते खराब झाले आहेत. अमृत जल योजनेसाठी शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे. मात्र खोदलेल्या रस्त्यावर मुरूम टाकल्याने चिखल होत आहे. कर्नाटकातून येणारी वाहने मिरज शहरात प्रवेश केल्यानंतर वाहनधारक शास्त्री चौकापासून खराब रस्त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत आहेत. मिरजेत खराब रस्ते व अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच आहे.
शहरातील ५० वर्षांपूर्वीचा अरुंद रिंग रोड रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी रस्त्याची पावसाने मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरणही गेली दहा वर्षे रखडले आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे २७ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. पावसाळा असल्याने या रस्त्याचे मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही. रस्त्यावरील खड्डे मुरुमाने भरल्याने चिखल होत आहे. या रस्त्यावर मुख्य बसस्थानक, शहरी बसस्थानक, लहान-मोठी रुग्णालये असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण आहेत.
चाैकट
कोटींचा खर्च; तरी रस्ते खराबच
महापालिका स्थापनेनंतर २३ वर्षात मिरजेतील रस्त्यावर शेकडो कोटी रुपये खर्च झाल्याची महापालिकेची आकडेवारी आहे. मात्र, शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मिरज वैद्यकीय नगरीचा आता खराब रस्त्यासाठी लाैकिक होत आहे.