गावभागातील रस्ते चिखलात रुतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:59+5:302021-07-17T04:21:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहराच्या गावभागातील रस्ते चिखलात रुतले आहेत. महापालिकेने गावभागात ड्रेनेजच्या नवीन वाहिन्यांची कामे केली. पण ...

गावभागातील रस्ते चिखलात रुतले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहराच्या गावभागातील रस्ते चिखलात रुतले आहेत. महापालिकेने गावभागात ड्रेनेजच्या नवीन वाहिन्यांची कामे केली. पण रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने नागरिकांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे.
गावभागाचा परिसर तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. या प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचे आहेत. तत्कालीन भाजपच्या सत्ताकाळात शंभर कोटीचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून गावभागातील विश्वविजय चौक, कैकाडी गल्ली, खिलारे गल्ली, जैन मंदिरासह विविध भागात ड्रेनेजची नवीन वाहिनी टाकण्यात आली. गावभागातील ड्रेनेजच्या वाहिन्याही ४० वर्षांपूर्वीच्या होत्या. त्या सतत तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत होते. नवीन वाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली आहे. पण पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. आता थोड्या पावसानेही संपूर्ण रस्ता चिखलमय होत आहे.
याबाबत नगरसेवक युवराज बावडेकर म्हणाले की, स्थानिक निधीतून पाच लाखाचा रस्ता मंजूर केला आहे. उर्वरित रस्त्यांसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीतून रस्त्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. पावसाळा संपल्यानंतर गावभागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल.