भवानीनगरमध्ये रस्ते, गटारीविना नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:41+5:302021-05-19T04:26:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : भवानीनगर (ता. वाळवा) येथे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये रस्त्यांची, गटारांची ...

भवानीनगरमध्ये रस्ते, गटारीविना नागरिकांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : भवानीनगर (ता. वाळवा) येथे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये रस्त्यांची, गटारांची सोय नाही. यामुळे येथील जनतेचे आरोग्यही धोक्यात असल्याचा आरोप काँग्रेसचे युवक सरचिटणीस राहुल वाकळे यांनी केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून वाॅर्ड क्रमांक तीनमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था बघवत नाही. येथील नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत घरात प्रवेश करावा लागतो. मोठा पाऊस झाला की, गटारी नसल्याने रस्त्यावरील पाणी घरात शिरते. यामुळे दुर्गंधी, डास व साथीच्या रोगांचा वारंवार प्रादुर्भाव होत असून, याबाबत ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला वारंवार माहिती देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे वाकळे यांनी सांगितले. या पावसाळ्यापूर्वी जर या वॉर्डातील रस्ते व गटारींचा प्रश्न ग्रामपंचायतीने मार्गी लावला नाही, तर येथील नागरिक उपोषण व आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
कोट
विकास कामात कोणतेच राजकारण नाही
ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून हा रस्ता व गटारांची तरतूद केली आहे. खर्चाला मान्यता मिळताच कामे सुरू होतील. गावातील अनेक विकासकामेही सुरू आहेत. टप्प्या-टप्प्याने प्रश्न नक्की मार्गी लावू.
राजेश कांबळे, सरपंच, भवानीनगर