भवानीनगर रेल्वे पुलाखालील मार्ग धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST2021-03-18T04:26:12+5:302021-03-18T04:26:12+5:30
शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी रस्त्यात उपसा जलसिंचन योजनेच्या सिमेंट पाईपलाईनला गळती लागल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये ...

भवानीनगर रेल्वे पुलाखालील मार्ग धोकादायक
शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी रस्त्यात उपसा जलसिंचन योजनेच्या सिमेंट पाईपलाईनला गळती लागल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी अंदाजे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा रस्ता आरपार करताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
मंगळवारी (दि. १६) संध्याकाळी आठ वाजता सांगली जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल पांडुरंग पाटील हे आपला नातू सूरज सर्जेराव पाटील यांच्याबरोबर दुचाकीवरून भवानीनगर येथून सोनकिरे येथे गावी निघाले होते. सूरज पाटील यांना अंधारामुळे रस्त्याचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही दुचाकी घसरून पाण्यात पडले. परंतु, वेळ चांगली असल्याने दोघेही बचावले अन्यथा अंधारात कोणीही नसताना त्यांनी एकमेकांचा आधार घेऊन पुलाखालून बाजूला झाले.
गेली अनेक वर्षांपासून येथे रेल्वे क्रॉसिंग गेटची मागणी शासनाच्या लालफितीत अडकून पडली आहे. ग्रामस्थांची मागणी असूनदेखील केवळ राजकीय फायद्यासाठी आणि सोयीसाठी रेल्वे क्रॉसिंग गेटचा प्रश्न स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठेचा करून लोंबकळत ठेवण्यातच धन्यता मानली आहे.