रस्ते गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 23:58 IST2015-09-19T23:56:51+5:302015-09-19T23:58:05+5:30

सर्वच गणेश मंडळांनी देखावे केले खुले

Road rises crowded | रस्ते गर्दीने फुलले

रस्ते गर्दीने फुलले

सांगली : शहरातील सर्वच गणेश मंडळांनी आपले देखावे शनिवारी खुले केले. देखावे पाहण्यासाठी आज अबालवृध्दांनी गर्दी केली होती. विशेषत: कॉलेज कॉर्नर ते गणपती पेठेपर्र्यंतचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता.
वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता यंदा गणेश मंडळांनी घेतली आहे. कॉलेज कॉर्नरवरील गणेश मंडळाने कॉलेजच्या शेजारच्या रस्त्यावर देखावा उभारला आहे. शहीद भगतसिंग मंडळानेही आपला मंडप यंदा छोटा केला आहे. या मंडळाने कालिका मंदिराची गुहा केली असून, पाठीमागील बाजूस अन्नछत्र मंडळ करण्यात आले आहे. जुन्या बुधगाव रस्त्यावरील वखारभाग मित्र मंडळाने पर्यावरणपूरक देखावा उभारला असून, यामध्ये हत्ती तीनचाकी सायकलीवरुन गणेशाला नेत असल्याचा देखावा आहे. याठिकाणी बालगोपाळांची गर्दी अधिक दिसून येत आहे. लक्ष्मीनारायण मंडळाने ‘नवजीवन ज्ञानेश्वरीला’ हा देखावा उभारला असून, याठिकाणीही गर्दी आहे. मोटार-मालक संघटनेच्या भव्य देखाव्याला शनिवारी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. पटेल चौकातील ‘चमत्कार खंडेरायाचा’ देखाव्यासाठी भली मोठी रांग लागत आहे. टेलिफोन भवनजवळ अष्टविनायक मंडळाने मंगेश मंदिराचा देखावा उभारला असून, यासाठी पुरुष व महिलांच्या रांगा लागत आहेत.
गणपती पेठ, सराफ कट्टा, दत्त मारुती रस्ता, शास्त्री चौक रस्ता आदी रस्ते रात्री आठनंतर गर्दीने फुलून गेले होते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला आईस्क्रिम, भेळ, दाबेली, चायनीज व इतर खाद्यपदार्थांचे हातगाडे लागले आहेत. स्पिकरसाठी पाचव्या, सातव्या, नवव्या व अकराव्यादिवशी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी असून, देखावे मात्र रात्री बारापर्यंत खुले राहणार आहेत. चौका-चौकात पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Road rises crowded