मिरजेत रस्त्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:02+5:302021-06-09T04:35:02+5:30
मिरज : मिरजेतील प्रभाग पाच मध्ये भीमनगर झोपडपट्टीत रस्त्यांची दैना उडाली आहे. पावसाने रस्त्यातील चिखलात ट्रक अडकल्याने नागरिकांनी महापालिका ...

मिरजेत रस्त्यांची दैना
मिरज : मिरजेतील प्रभाग पाच मध्ये भीमनगर झोपडपट्टीत रस्त्यांची दैना उडाली आहे. पावसाने रस्त्यातील चिखलात ट्रक अडकल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
भीमनगर झोपडपट्टीत पावसाचे पाणी येथील घरात शिरते. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होत आहेत. रस्त्यावर चिखलात दररोज वाहने अडकत आहेत. येथील नगरसेवकांचे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष आहे. नादुरुस्त ड्रेनेज व रस्त्यावरील खड्डे, त्यात साचणारे पावसाचे पाणी यामुळे येथील नागरिक संतप्त आहेत. दोन दिवसांपूर्वी येथे पावसाचे पाणी घरात घुसले होते. नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांनी रस्ता ड्रेनेज व पाण्याच्या निचऱ्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन देत तोंडाला पाने पुसली. मंगळवारी तेथील रस्त्यात विटाने भरलेला ट्रक अडकल्याने नागरिकांनी अडकलेला ट्रक काढण्यास विरोध करीत या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्याचा इशारा दिला. महापालिका प्रशासन व नगरसेवकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली. प्रशासनाने पावसाळ्यानंतर रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर ट्रक काढून वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.