इस्लामपुरात रस्त्यावरुन पुन्हा खडाखडी
By Admin | Updated: April 10, 2015 00:37 IST2015-04-09T23:41:11+5:302015-04-10T00:37:07+5:30
पवार बंधूंचा आक्रमक पवित्रा : आनंदराव मलगुंडे यांची मध्यस्थी

इस्लामपुरात रस्त्यावरुन पुन्हा खडाखडी
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात पालिकेमार्फत सुरु असलेल्या रस्ते कामांना विरोध करण्याचा पवित्रा कायम ठेवत वैभव व विजय पवार बंधूंनी झरी नाका ते आझाद चौक रस्त्यावर आज ठिय्या मारला. मात्र सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी दोघांना सबुरीचे सल्ले देत, नियमाप्रमाणे काम करून घेऊ, असा शब्द दिला. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी सुध्दा आज मैदानात उतरले.
शहरात रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. ही कामे निविदेतील तरतुदीनुसार होत नाहीत, हे वारंवार सिध्द करीत वैभव व विजय पवार यांनी पालिका प्रशासनासह सत्ताधारी गटाला आमने-सामने येण्याचे आव्हान दिले आहे. मात्र पालिका मात्र प्रशासनालाच पुढे करीत घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांशी वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत.
वाळवा बझारसमोरील नियमबाह्य रस्ताकाम बंद पाडल्यानंतर ठेकेदाराने आपला मोर्चा झरी नाका ते आझाद चौक या रस्त्याकडे वळवला. तेथेही पवार बंधूंनी हजेरी लावली.
या रस्त्याच्या बाजूने भुयारी वीज केबल टाकण्यात आल्या आहेत. तेथे रस्ता खचण्याचा धोका आहे. त्यामुळे या चरी खोदून तेथे भर करा, रस्त्यावरील खडीकरणाचे काम काढून घ्या, अशी मागणी पवार बंधूंनी लावून
धरली.
मात्र माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी दोघांच्या आक्रमकपणाला थोपवत, चांगला रस्ता होण्यासाठी सूचना करा, तसा रस्ता करुया, असे म्हणत त्यांचा विरोध शमवला. शेवटी चरीचे खोदकाम करण्याला सुरुवात झाली.
यावेळी नगरसेवक कपिल ओसवाल, विजय कुंभार, माजी नगरसेवक आयुब हावलदार, गजानन फल्ले, अमित ओसवाल, अभियंता शाम खटावकर, अविनाश जाधव यांच्यासह त्या परिसरातील व्यापारी उपस्थित होते. (वार्ताहर)
रस्त्यावरच मारला ठिय्या
शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे निविदेतील तरतुदीनुसार होत नाहीत, हे सिध्द करीत वैभव व विजय पवार यांनी पालिका प्रशासनासह सत्ताधारी गटाला आमने-सामने येण्याचे आव्हान दिले आहे. वाळवा बझारसमोर नियमबाह्य रस्ताकाम बंद पाडल्यानंतर ठेकेदाराने आपला मोर्चा झरी नाका ते आझाद चौक या रस्त्याकडे वळवला. तेथेही पवार बंधूंनी गु़रुवारी विरोध करीत ठिय्या मारला. या रस्त्याच्या बाजूने भुयारी वीज केबल टाकण्यात आल्या आहेत. तेथे रस्ता खचण्याचा धोका आहे. त्यामुळे या चरी खोदून तेथे भर करा, अशी मागणी पवार बंधूंनी लावून
धरली.