विठ्ठलवाडीत रस्ता बंद केल्याने अनेक कुटुंबांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:16+5:302021-06-16T04:35:16+5:30
इस्लामपूर : विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वातव्यास असणाऱ्या बहुजन समाजातील १५ ते २० कुटुंबांचा ...

विठ्ठलवाडीत रस्ता बंद केल्याने अनेक कुटुंबांची अडचण
इस्लामपूर : विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वातव्यास असणाऱ्या बहुजन समाजातील १५ ते २० कुटुंबांचा रस्ता खासगी मालकाकडून बंद करण्यात आल्याने या कुटुंबांच्या येण्या-जाण्याची गैरसोय झाली आहे.
याबाबतचे निवेदन दलित महासंघाच्यावतीने तहसीलदार कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार सुनील ढाले यांना दिले आहे. विठ्ठलवाडीतील बहुजन समाजातील कुटुंबे २५-३० वर्षांपासून वातव्यास आहेत. त्यांना शेताच्या बांधावरून येण्या-जाण्याची वहिवाट होती. ही सर्व कुटुंबे ग्रामपंचायतीकडे सर्व शासकीय कराचा भरणा करीत आहेत. मात्र, हा रस्ता काटेरी तारेचे कुंपण घालून बंद करण्यात आल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. रस्ता नसल्याने शाळा, रुग्णालये किंवा इतर कारणासाठी त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी शशिकांत नांगरे यांनी केली आहे. यावेळी नागनाथ घाटगे, संभाजी मस्के, शब्बीर बैरागदार, राजेंद्र पवार, अक्षय थोरात उपस्थित होते.