पेठ - सांगली मार्गावर आज रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:46+5:302021-02-06T04:48:46+5:30
इस्लामपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवार, ६ रोजी इस्लामपूर येथील पेठ - सांगली मार्गावर ...

पेठ - सांगली मार्गावर आज रस्ता रोको आंदोलन
इस्लामपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवार, ६ रोजी इस्लामपूर येथील पेठ - सांगली मार्गावर चव्हाण कॉर्नर येथे सकाळी ११ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिली.
तालुकाध्यक्ष जाधव म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना, विद्रोही संघटना व विविध संघटनांच्यावतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जी कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या माथी मारली आहेत, ती विधेयके रद्द करावीत, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव भाजप सरकार आखत आहे. शेतकऱ्यांना शत्रू ठरवून मार्ग बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर खिळे मारणे, काटेरी कुंपण, रस्त्यावर खंदक खोदले आहेत. त्यामुळे देशव्यापी चक्काजामची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने दिली आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पेठ - सांगली मार्गावर शनिवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जाधव यांनी केले.