कोरोनानंतर लहान मुलांत एमआयएससी सिंड्रोमचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:27+5:302021-06-16T04:36:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर ओसरत असतानाच जिल्ह्यातील बाधितांची संख्याही स्थिर होत आहे. या पार्श्वभूमीवर ...

कोरोनानंतर लहान मुलांत एमआयएससी सिंड्रोमचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर ओसरत असतानाच जिल्ह्यातील बाधितांची संख्याही स्थिर होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी सुरू केली आहे. यात लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, त्यातही कोरोनानंतर ‘एमआयएससी सिंड्रोम’चा धोका अधिक असल्याने वेळीच निदान होऊन उपचारास प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पहिल्या लाटेत ज्येष्ठ व सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या कोरोनाचा दुसऱ्या लाटेत रूप बदलत तरुणांवर अधिक प्रभाव दिसून आला. आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असल्याचे भारतीय बालरोग संघटनेने व्यक्त केली आहे. समाधानाची बाब म्हणजे यातील केवळ एक टक्का मुलांनाच याचा अधिक धोका जाणवू शकतो तर इतर मुले कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकणार आहेत. विशेष म्हणजे कोणतेही लक्षण नसताना निदान झालेल्या मुलांचे प्रमाणही यात जादा असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लहान मुलांना कोरोना होऊन गेल्यानंतर त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये काही असामान्य बदल झाल्यामुळे एमआयएससी (मल्टिसिस्टीम इन्फ्लंमटरी सिंड्रोम इन चाइल्ड) नावाचा आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. पालकांना याची माहिती असणे आवश्यक आहे. कोरोना झालेल्या मुलांमध्ये या सिंड्रोमची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार सुरू केल्यास धोका टाळता येणार आहे.
या आजाराकडे दुर्लक्ष केले किंवा निदान करण्यास उशीर झाला तर याचा बालकाच्या हृदयावर, हृदयाला रक्तप्रवाह पोहोचवणाऱ्या रक्तवाहिनीवर होऊन लहान मुलांनासुद्धा हार्टअटॅक येऊ शकतो. नवजात शिशूपासून २१ वर्षांच्या तरुणांपर्यंत हा आजार होऊ शकतो. कोरोना होऊन गेल्यानंतर दोन ते बारा आठवड्यापर्यंत याची बाधा होण्याची शक्यता बालरोगतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे अद्याप मुलांना संसर्ग वाढला नसला तरी त्याची काळजी घेणेच सध्यातरी पालकांच्या हाती आहे.
चौकट
एमआयएससी सिंड्रोमची लक्षणे
ताप, डोळे येणे, तोंड किंवा ओठ लाल होणे, अंगावर पुरळ उठणे, हातापायाला सूज येणे आदी लक्षणे असली तरी बालरोगतज्ज्ञांचे निरीक्षण व त्यांच्याकडून योग्य सल्ला घेऊनच याबाबतचे उपचार सुरू करणे आवश्यक आहेत. पालकांनी या लक्षणांवर केवळ अंदाज न बांधता डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे.
कोट
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा लक्षणीय प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. लहान मुलांमध्ये जरी लक्षणीय प्रमाणात संसर्ग झाला तरी ९० टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे असतील किंवा केवळ टेस्ट पॉझिटिव्ह असून, कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, मात्र आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
डॉ. शिशिर मिरगुंडे, टास्क फोर्सप्रमुख, बालराेग विभाग