उत्सवाच्या उत्साहावर मिठाईच्या भाववाढीचे विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:30+5:302021-09-15T04:30:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ऐन सणासुदीच्या हंगामात मिठाईचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. दूध आणि साखर ...

उत्सवाच्या उत्साहावर मिठाईच्या भाववाढीचे विरजण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ऐन सणासुदीच्या हंगामात मिठाईचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. दूध आणि साखर हा प्रमुख कच्चा माल स्थिर असतानाही मिठाई मात्र महाग झाली आहे.
श्रावण, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळीत मिठाईची मागणी प्रचंड वाढते. यंदा श्रावणापासून लॉकडाऊन शिथिल झाल्याने दुकानांत ग्राहकांची गर्दी आहे. मिठाईची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, पण ग्राहकांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. दरवाढीचा परिणाम विक्रीवरही झाल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. दूध आणि साखर स्थिर असली, तरी अन्य कच्च्या मालाची भाववाढ आवाक्याबाहेर झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
कोट
गॅस, खाद्यतेलाच्या दरवाढीने मिठाईदेखील महागली
गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडर ५०० रुपयांनी महागला आहे. खाद्यतेलाचा १५ किलोंचा डबा १४०० ते १६०० रुपयांना मिळायचा, तो २२०० रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ खूपच त्रासदायक ठरली आहे. मैद्याचे ५० किलोंचे पोते ११५० रुपयांवरून १३०० रुपये झाले, तर खवा, साखरेसह वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे मिठाईचे दर वाढवावेच लागले. दिवाळीपर्यंत कदाचित आणखी भाववाढ होऊ शकेल.
- नाविद मुजावर, मिठाई विक्रेता
बॉक्स
दरावर नियंत्रण कोणाचे?
मिठाईच्या दर्जावर अन्न व अैाषध प्रशासन नियंत्रण ठेवते, पण दरावर मात्र कोणाचेच नियंत्रण नाही. नाही म्हणायला बेकरी व स्वीट मार्ट असोसिएशनने मात्र स्वत:हून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
बॉक्स
भेसळीकडे असू द्या लक्ष
- सणासुदीला मिठाईची मागणी प्रचंड वाढत असल्याने भेसळखोरांचे फावते हे ग्राहकांनी लक्षात ठेवावे.
- खवा, पनीर, दूध, रवा, मैदा यामध्ये सर्रास भेसळीचे प्रकार घडतात.
- त्यामुळे ब्रॅण्डेड आणि अधिकृत दुकानांतूनच मिठाई खरेदी करावी. रस्त्यावरील स्वस्तातील खरेदी टाळावी.
कोट
मिठाईची खरेदी आता गोडव्यापुरतीच
गणपतीला नैवेद्यासाठी लाडूची खरेदी केली. किलोचा दर ४० ते ६० रुपयांनी वाढल्याचे विक्रेत्याने सांगितले, त्यामुळे एक किलोऐवजी अर्धाच किलो घेतली. उत्सवात नैवेद्य पाहिजेच म्हणून गोडव्यापुरती खरेदी केली.
- विशाल कुलकर्णी, ग्राहक
मिठाईचे वाढलेले दर पाहता घरीच केलेली परवडेल असे वाटते. खवा पेढा आणि कलाकंद घ्यायचा होता, पण दोन्हींचे दर ८० ते १०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे थोडीच खरेदी केली.
- स्नेहा पालकर, ग्राहक