जयंतरावांच्या उजव्या, डाव्या नेत्यांत कुरघोड्या
By Admin | Updated: April 23, 2015 00:41 IST2015-04-22T22:42:11+5:302015-04-23T00:41:17+5:30
जिल्हा बँकेसाठी खटाटोप : योग्य-अयोग्यतेसाठी दाखले

जयंतरावांच्या उजव्या, डाव्या नेत्यांत कुरघोड्या
अशोक पाटील- इस्लामपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदावर वर्णी लागण्यासाठी जयंत पाटील यांचे उजवे आणि डावे नेतेच आता एकमेकांवर कुरघोड्या करू लागले आहेत. आपण संचालकपदासाठी कसे योग्य आहोत आणि दुसरा कसा अयोग्य आहे, हेच जयंत पाटील यांच्यापुढे मांडले जात आहे.
वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. जिल्हा बँकेवरही पकड असावी, यासाठी पाटील यांचा प्रयत्न आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे बँकेवर तज्ज्ञ संचालकच निवडून जावेत, अशी अपेक्षा जयंत पाटील यांची आहे. परंतु प्रत्येक गावात त्यांचे स्वत:चे दोन-दोन, तीन-तीन गट आहेत. या गटाचे म्होरके आपण पाटील यांचे निकटवर्तीय आहोत, असा तोरा चावडीवर मिरवताना दिसत आहेत. काही नेते तर त्यांची हुबेहूब नक्कलही करताना दिसतात.
तालुक्यातील तीसभर नेत्यांनी संचालकपदाची मागणी केली आहे. यासाठी पाटील यांनी इच्छुकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोल्हापूर, सांगली सीमाभागावर असलेल्या एका गावातील नेत्याने स्वत:चे कर्तृत्व पाटील यांच्यापुढे मांडले. या नेत्याने तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांवर टीका-टिप्पणी केली. आपण संचालक पदासाठी सुदृढ आहे, इतर इच्छुकांना हृदयरोग, मधुमेह आदी विकार जडले असून, राजकीय वारसा नसल्यामुळे मलाच संधी मिळावी, अशी मागणी करताच उपस्थितांतून हशा पिकला.
बँकेच्या संचालक पदासाठी ऐतवडे खुर्द येथील डॉ. प्रताप पाटील यांनी अर्ज भरला आहे, तर त्याच गावातील रघुनाथ पाटील यांनीही अर्ज दिला आहे. कणेगाव येथील जयंत पाटील यांचे उजवे हात समजणारे भीमराव पाटील-कणेगावकर यांनी अर्ज भरला आहे, तर विलासराव शिंदे गटाचे अॅड. विश्वासराव पाटील यांनीही अर्ज भरून भीमराव पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरेगाव येथील बी. के. पाटील यांचे अंतर्गत विरोधक असलेले व्यंकटराव पाटील यांनीही अर्ज भरून बी. के. पाटील यांना आव्हान उभे केले आहे.
ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या कागाळ्या सांगून आपणास संधी कशी मिळेल, यातच स्वारस्य मानत आहेत.