संघर्षातून रिक्षाचालकांत हाणामारी
By Admin | Updated: February 15, 2015 00:49 IST2015-02-15T00:46:57+5:302015-02-15T00:49:21+5:30
मिरजेतील प्रकार : रेल्वे आवारात पॅगोंना प्रवेश बंदी

संघर्षातून रिक्षाचालकांत हाणामारी
मिरज : मिरजेत तीन आसनी व पॅगो रिक्षाचालकांत पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला असून, हाणामारीचे प्रकार सुरू आहेत. पॅगो व तीन आसनी रिक्षाचालकांनी आपापली हद्द ठरवून घेतली असून, परस्परांच्या हद्दीत प्रवेश बंदी लागू केली आहे. रेल्वे स्थानकाच्या आवारात पॅगो रिक्षा चालकांना प्रतिबंधाचा फलक लावण्यात आला असून, प्रतिबंध आदेशाचे उल्लंघन केल्यास अप्रिय घटनेचा इशारा देण्यात आला आहे.
दोन गटात अनेकदा हाणामाऱ्यांचे प्रकार घडले आहेत. वाहतूक पोलीस व परिवहन विभागाने तत्पुरता तोडगा काढून या वादावर मलमपट्टी करण्याचे धोरण आहे. मात्र यामुळे पॅगो व तीन आसनी चालक शहरात प्रवासी वाहतुकीचा अधिकार कोणाचा, यावरून वारंवार आमने-सामने येत आहेत.
चार दिवसांपूर्वी बसस्थानकाच्या आवारात प्रवासी घेण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांच्या दोन गटात मारामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटात तडजोड होऊन बसस्थानक व रेल्वेस्थानक आवारातून प्रवासी वाहतूक करण्यास पॅगो रिक्षांना प्रतिबंध घालण्यात आला. बसस्थानक व रेल्वेस्थानकाच्या दरम्यान पोस्ट आॅफिसजवळ पॅगो रिक्षाचा नवीन थांबा करण्यात आला असून, तेथून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याचे तीन आसनी रिक्षाचालक संघटनेचे अजमुद्दीन खतीब व पॅगो रिक्षाचालक संघटनेचे महेश चौगुले यांनी सांगितले. मात्र तडजोडीनंतरही रिक्षाचालकांनी परस्परांच्या हद्दीचे उल्लंघन करू नये, यासाठी रेल्वेस्थानकाच्या आवारात पॅगो रिक्षांना प्रतिबंधाचा फलक लावण्यात आला आहे. रिक्षाचालकांतील संघर्ष व त्यांच्यातील तडजोड, हद्द निश्चित करण्याच्या प्रकाराबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौनाची भूमिका घेतली आहे. (वार्ताहर)