खंडणीसाठी रिक्षाचालकाचे अपहरण
By Admin | Updated: March 27, 2015 00:50 IST2015-03-27T00:50:38+5:302015-03-27T00:50:38+5:30
सांगलीतील घटना : बेदम मारहाण; पाचजणांवर गुन्हा

खंडणीसाठी रिक्षाचालकाचे अपहरण
सांगली : महिन्याला एक हजाराची खंडणी द्यावी, या मागणीसाठी गोकुळनगरमधील पाच फाळकूटदादांनी शामराव शिवाजी आलगूर (वय ३०, रा. संजयगाधी झोपडपट्टी, सांगली) यांचे अपहरण करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. संजयनगरमधील परांजपे पार्क येथील म्हसोबा मंदिरजवळ गुरुवारी रात्री साडेबारा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी कंबळे, अशोक इंगळे, विकी वाघमारे, हणमंता व दगडू (पूर्ण नावे निष्पन्न नाहीत.) अशी गुन्हा दाखल झालेल्या फाळकूटदादांची नावे आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या शामराव आलगूर यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. ते गोकुळनगरच्या रिक्षा थांब्यावर रिक्षा लाऊन व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री साडेबारापर्यंत ते थांब्यावर होते. त्यानंतर रिक्षा घेऊन घरी निघाले होते. शिंदे मळ्यातील रेल्वे ब्रीजखालून जाताना संशयित दुचाकीने पाठीमागून आले. त्यांनी आलगूर यांना रिक्षा थांबविण्यास भाग पाडले. संशयितांना भाड्याने रिक्षा पाहिजे असेल, असा विचार करून त्यांनीही रिक्षा थांबविली.
संशयितांनी आलगूर यांना रिक्षातून ओढून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आलगूर यांनी त्यांना ‘काय पाहिजे’, अशी विचारणा केली. त्यावेळी संशयितांनी ‘तू आम्हाला महिन्याला एक हजार रुपये खंडणी दिली पाहिजेस’ अशी मागणी केली. आलगूर यांनी नकार दिल्यानंतर संशयितांनी पुन्हा बेदम मारहाण केली. आलगूर यांनी आरडाओरड केल्यानंतर ते पळून गेले. (प्रतिनिधी)